नाशिक : नितीन गडकरींना राष्ट्रवादीचे पत्र ; फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा | पुढारी

नाशिक : नितीन गडकरींना राष्ट्रवादीचे पत्र ; फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय महामार्ग तीनवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या समस्यांबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात 15 ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्त न केल्यास वाहनांवरील फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम—ाज्य पसरले आहे. पावसाच्या जोरदार सरी आणि त्यात खड्ड्यांंची भर यामुळे घोटी, इगतपुरी व कसारा घाटात अनेक अपघात होत आहेत. कसारा घाटात अपघात झाल्यास दोन ते तीन दिवस वाहनाच्या लांबच लांब रांगा लागतात. 12-12 तास वाहतूक खोळंबा पाहावयास मिळत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर एकूण तीन टोल नाके असूनदेखील या महामार्गाची दयनीय अवस्था पाहावयास मिळत आहे. दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते. परंतु रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला जात नसल्याने प्रत्येक वर्षी रस्त्यांवर मोठ खड्डे पडतात. 15 ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय महामार्ग 3 (मुंबई-नाशिक)वरील खड्डे तातडीने बुजवून दर्जेदार रस्ता तयार न केल्यास वाहनांवरील फास्टटॅगवर काळे स्टिकर लावण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला.

प्रवास करताना अधिक वेळ
टोल वसूल करणार्‍या कंपन्यांकडून केवळ पैसे वसुलीचे काम होत आहे. मोठ्या प्रमाणावर टोल आकारूनही वाहनधारकांना खड्ड्यातून मार्गक्रमण करत वाटचाल करावी लागते. मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण झाल्यामुळे नाशिकहून मुंबईचे अंतर तीन ते साडेतीन तासांवर आले. परंतु, खड्ड्यांमुळे हेच अंतर दीड ते दोन तासांनी वाढले आहे. खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी सूचना राष्ट्रवादी युवकतर्फे अंबादास खैरे यांनी केली.

हेही वाचा :

 

Back to top button