जरीफ बाबा यांच्या दफनविधीबाबतचा पेच सुटला, पोलीस अधीक्षकांनी दिली ‘ही’ माहिती | पुढारी

जरीफ बाबा यांच्या दफनविधीबाबतचा पेच सुटला, पोलीस अधीक्षकांनी दिली 'ही' माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अफगाणिस्तान येथील निर्वासित व सुफी धर्मगुरू जरीफ अहमद चिश्ती (28) यांचा मृतदेह ओझर विमानतळावरून मुंबईला पाठवल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

संपत्तीच्या वादातून चिश्ती यांची हत्या करण्यात आली. ते अफगाण निर्वासित असल्याने त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत अडचणी येत होत्या. मात्र, अफगाणिस्तान दूतावास कार्यालयाने ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याने आता दफनविधीबाबत निर्माण होणारा पेच सुटला आहे. त्यामुळे ओझर विमानतळावरून मृतदेह मुंबईला पाठविल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

माजी वाहनचालक, सेवक यांनी संगनमत करीत 5 जुलैला येवला येथे डोक्यात गोळी झाडून चिश्ती यांची हत्या केली होती. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तपास करून चार संशयितांना अटक केली आहे. गोळीबार करणारे दोघे अद्याप फरार आहेत. दरम्यान, चिश्ती यांचे नातलग अफगाणिस्तानात असल्याने त्यांच्यावर तिकडेच अंत्यसंस्कार करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी भारतातील अफगाण दूतावासाशी संपर्क साधला होता. अखेर सर्व नियमांची पूर्तता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह अफगाणिस्तान येथे पाठवण्यास दूतावासाने परवानगी दिली. त्यानुसार पोलिसांनी चिश्तींचा मृतदेह मुंबई येथे पाठविला आहे.

हेही वाचा :

Back to top button