नाशिक : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार नवे मनपा आयुक्त, रमेश पवार यांची बदली | पुढारी

नाशिक : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार नवे मनपा आयुक्त, रमेश पवार यांची बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका आयुक्त रमेश पवार यांची राज्य शासनाने शुक्रवारी (दि.22) तडकाफडकी बदली केली. मनपाच्या आयुक्तपदी शासनाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करत तत्काळ कार्यभार स्वीकारण्याची सूचना केली आहे.

राज्यात ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार स्थापन झाले तेव्हाच पवार यांच्या बदलीची चर्चा रंगली होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले एवढेच. पवार यांचे केडर हे नाशिक मनपाच्या पात्रतेचे नव्हते, असे त्यांच्या नियुक्तीवेळी बोलले गेले. मात्र, त्याबाबत ठाकरे सरकारनेच निर्णय घेतल्याने त्यावर फारशा काही प्रतिक्रिया उमटल्या नव्हत्या.
नाशिकमधील म्हाडा सदनिका व भूखंड हस्तांतरित प्रकरणाचे निमित्त करत शासनाने कैलास जाधव यांची चार महिन्यांपूर्वी तडकाफडकी बदली करत त्यांच्या जागी मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई महापालिकेचे केडर असताना नाशिक महापालिकेत बदली झाल्याने थेट मातोश्रीचाच हस्तक्षेप असल्याची चर्चा रंगल्याने त्यांच्या नियुक्तीबाबत फारसा कोणीही आक्षेप घेतला नाही.

मनपाची सूत्रे हाती घेतल्यापासून गेल्या चार महिन्यांत आयुक्त पवार यांनी त्यांच्या कामकाजाचा ठसा उमटविला. गोदावरी प्रदूषण असेल, शहरातील स्वच्छता याबाबींना त्यांनी प्राधान्य दिले. पावसाळ्यात रस्ते खराब झाल्याने अनेक ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन दुरुस्तीचे आदेश दिले होते. गोदावरीला आलेल्या पुरामुळे नुकसान होऊ नये, यासाठी ते कार्यरत राहिले. पहाटेच्या वेळी शहरात रिक्षातून फेरफटका मारून पाहणी करणे, ही बाब नाशिककरांना भावली. महापालिकेच्या कामकाजातदेखील त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. मनपा कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला असून, पुढील महिन्यात त्याचा लाभ कर्मचार्‍यांना मिळणार आहे. महापालिकेचे सुमारे 2,800 कोटींचे दायित्व कमी करण्यासाठी त्यांनी अनावश्यक अनेक कामांना कात्री लावली. यामुळे आजमितीस सुमारे 700 कोटींची दायित्वाची रक्कम कमी झाली आहे.

Back to top button