आदित्य ठाकरे -सुहास कांदे येणार आमनेसामने, मनमाडमध्ये होणार आज ‘सामना’ | पुढारी

आदित्य ठाकरे -सुहास कांदे येणार आमनेसामने, मनमाडमध्ये होणार आज 'सामना'

नाशिक/ नांदगाव : पुढारी ऑनलाइन

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. काल नाशिक येथील मेळाव्यानंतर आज शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघात आदित्य ठाकरे यांची संवाद यात्रा होणार आहे. सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे यादरम्यान भेटण्याची वेळ मागितली आहे. ‘माझं काय चुकलं’? या मथळ्याखाली ते आदित्य ठाकरे यांना काही प्रश्न विचारणार आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी दिली, तर मी आमदारकीचा राजीनामा देतो, पुन्हा निवडणूक लढवतो असे आव्हानच त्यांनी आदित्य ठाकरे यांना केले आहे.

या भेटीसाठी पोलिसांनी सुहास कांदे यांना परवानगी नाकारली असल्याने पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्याला परवानगी दिली आहे का? असा सवाल त्यांनी पोलिसांना केला आहे. कांदे हे मनमाडकडे रवाना झाले आहेत. परवानगी दिली तर ठीक नाही तर जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत भेटू असे आव्हान देत दहा हजार कार्यकर्ते सोबत घेऊन ते आदित्य ठाकरे यांना भेटणार आहेत. आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत, उद्धव ठाकरे आमचे विठू आहेत, त्यांच्याविषयी आम्ही अपशब्द बोलणार नाही. परंतू हिंदुत्व व विकासकामे याविषयावर नक्कीच प्रश्न करु असे कांदे यांनी म्हटले आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी भेट न दिल्यास रस्त्यावर उतरु व आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांना जेलमध्ये टाकणा-यांच्या मतदार संघात निधी दिला जातो, पण मला नाही. असा सवाल करत त्यांनी छगन भुजबळांवरही निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांचे मनमाडच्या विकासात कोणतेही योगदान नाही. आदित्य ठाकरे यांनी नांदगाव मतदार संघात एखाद्या विकास कामासाठी निधी दिल्याचे दाखवावे मी आमदारकी सोडेल असे थेट आव्हानच त्यांनी आदित्य ठाकरे यांना केले आहे. दरम्यान आज शिवसेना कार्यकर्ते व सुहास कांदे समर्थक आमने – सामने येणार असल्याने संपू्र्ण मतदारसंघाचे या भेटीकडे लक्ष लागून आहे.

Back to top button