नाशिक : सततच्या पावसाने भातलागवडीला वेग, खरिपाच्या 78 टक्के पेरण्या पूर्ण | पुढारी

नाशिक : सततच्या पावसाने भातलागवडीला वेग, खरिपाच्या 78 टक्के पेरण्या पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात या आठवड्यापर्यंत खरिपाच्या 77.85 टक्के पेरण्या झाल्या असून, जुलैअखेर पेरण्या पूर्ण होतील, असा कृषी विभागाला विश्वास आहे. दरम्यान जुलै महिन्यातील सततच्या पावसामुळे भाताच्या लागवडीला वेग आला असून, आतापर्यंत 18.61 टक्के लागवड झाली आहे.

जिल्ह्यातील खरिपाच्या 6,41,394 हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत 4,99,315 हेक्टरवर पेरणी झाली असून, सर्वाधिक पेरणी मक्याची झाली आहे. जिल्ह्यातील मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र 21,6,112 हेक्टर असून, आतापर्यंत 22,9,145 हेक्टर म्हणजे 106 टक्के पेरणी झाली आहे. मकाखालोखाल सोयाबीनची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र 75,562 हेक्टर असून, आतापर्यंत 10,0,672 हेक्टर म्हणजे 133 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील खरीप हंगामात मकाखालोखाल बाजरीचे 11,3,504 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. मात्र, शेतकर्‍यांनी बाजरीकडे पाठ फिरवल्यामुळे आतापर्यंत बाजरीची केवळ 65,551 हेक्टरवर म्हणजे 57 टक्के पेरणी झाली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पश्चिम पट्ट्यात संततधारेला सुरुवात झाल्यानंतर आठ-दहा दिवस तेथे अतिवृष्टी झाली. यामुळे भाताच्या लागवडीला व्यत्यय येत होता. आता पावसाचा जोर कमी झाला असल्याने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, नाशिक या तालुक्यांमध्ये भातलागवडीला वेग आला आहे. जिल्ह्यात भाताचे सर्वसाधारण क्षेत्र 88,738 हेक्टर असून, आतापर्यंत 16,518 हेक्टरवर लागवड झाली आहे. डाळवर्गीय पिकांचे जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र 35,877 हेक्टर असून, 26,057 हेक्टर म्हणजे 72 टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात तेलबियांचे सर्वसाधारण क्षेत्र 10,8,405 असून, त्यावर आतापर्यंत 12,0,291 म्हणजे 110 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातील 1 लाख 672 हेक्टर क्षेत्र एकट्या सोयाबीनचे आहे. सोयाबीनपाठोपाठ भूईमुगाच्या 19,147 हेक्टर म्हणजे 73 टक्के पेरण्या झाल्या आहेत. भुईमुगाचे 25,926 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे.

हेही वाचा :

Back to top button