नाशिक : शिवसेनेत विभाजन अटळ | पुढारी

नाशिक : शिवसेनेत विभाजन अटळ

नाशिक; प्रताप जाधव :  शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही आमदार कमी-अधिक अंतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झालेले असले तरी अन्य कुठलाही प्रमुख पदाधिकारी अद्याप तरी उघडपणे मूळ शिवसेनेबद्दल नाराजीची भावना व्यक्‍त करीत नसल्याने संघटना सध्या तरी एकसंध भासते आहे. मात्र, शिंदे यांना यापुढे संघटनेत प्रतिसाद मिळणारच नाही, असा याचा अर्थ नाही. न्यायालयातील प्रकरणे संपुष्टात येऊन शिंदे सरकार स्थिर झाल्यावर खर्‍या अर्थाने जिल्ह्यात नेमके विभाजन पाहायला मिळेल, असे आजचे चित्र आहे.

नाशिक महापालिकेचा कार्यकाळ संपताना शिवसेनेचे 35 नगरसेवक होते. मुख्यमंत्री शिंदे यांचा खुंटा बळकट होताच त्यातील सुमारे 15 नगरसेवक नवनिर्मित गटात जातील, असे बोलले जाते. याशिवाय, काही माजी पदाधिकारीही संघटनेत पद मिळण्याच्या आशेने शिंदे यांच्या सोबत जातील, अशी चर्चा आहे. काही विद्यमान पदाधिकार्‍यांचे शिंदे यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. ते अधिकृतरीत्या नसले तरी मनाने कधीच तिकडे गेले असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

नांदगावचे तेजतर्रार आमदार सुहास कांदे सुरतला शिंदे यांच्याबरोबर पहिल्या जत्थ्यातच रवाना झाले. मालेगाव बाह्यचे आमदार, माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी मात्र उठावाच्या पहिल्या टप्प्यात समेटाची भूमिका घेत नंतर शिंदेंची शिलेदारी स्वीकारली. बलशाली अशा हिरे घराण्याची दशकानुदशकांची सद्दी संपवण्याचा पराक्रम करणार्‍या भुसे यांनी लागोपाठ चार वेळा विधानसभा गाठली आहे. त्यातील दोन वेळा मंत्रिपदही प्राप्‍त केले आहे. या काळात त्यांनी निदान मालेगावात तरी भुसे म्हणजेच शिवसेना असे समीकरण स्थापित करून ठेवले आहे. यामुळे साहजिकच, जुनेजाणते ज्येष्ठ शिवसैनिक अडगळीला पडले आहेत.

नांदगावमध्ये कांदे यांनी भुसे यांच्याप्रमाणेच जुन्या शिवसैनिकांवर अवलंबून न राहता स्वतंत्र बस्तान बसवले आहे. मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण असलेले मनमाड हा शिवसेनेचा बालेकिल्ला. कांदे यांच्या सत्ताकाळात तेथील नवे-जुने निष्ठावंत शिवसैनिक बाजूला पडले. आता कांदे यांचे जिल्हाप्रमुखपद काढून ते येथीलच गणेश धात्रक यांना दिले आहे. तसेच, ज्येष्ठ शिवसैनिक अल्ताफ खान यांना सहसंपर्कप्रमुख पदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

खा. गोडसे शिंदे गटात
शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 12 खासदारांमध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचाही समावेश आहे. ते मनसेतून शिवसेनेत आलेले आहेत. आठ वर्षांच्या काळात शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यात त्यांचा फारसा सहभाग जाणवला नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा संघटनेवर फारसा परिणाम संभवत नाही.

Back to top button