नाशिक : ‘स्मार्ट’ ठेकेदारांना आता पोलिस संरक्षण, नागरिकांकडून मारहाणीनंतर कार्यवाही | पुढारी

नाशिक : ‘स्मार्ट’ ठेकेदारांना आता पोलिस संरक्षण, नागरिकांकडून मारहाणीनंतर कार्यवाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जुने नाशिक आणि पंचवटी भागातील गावठाण परिसरात सध्या अनेक कामे स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून सुरू आहेत. मात्र, कामांमध्ये होणारी दिरंगाई आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने कंपनीचे अभियंते आणि ठेकेदारांच्या कामगारांना मारहाणीचे प्रकार घडल्याने कामे सुरू न करण्याची भूमिका घेणार्‍या ठेकेदारांना आता पोलिस संरक्षण मिळणार आहे. यामुळे पुन्हा कामे सुरू होणार आहेत.

स्मार्ट सिटी कंपनीमार्फत प्रोजेक्ट गोदांतर्गत विविध कामे सुरू आहेत. तसेच गावठाण भागात तर सुमारे 194 रस्त्यांची कामे सुरू असून, यातील 94 रस्ते रुंद, तर इतर रस्ते अरुंद आहेत. अशा अरुंद रस्त्यांवर कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. व्यवसायावर परिणाम झाल्याने व्यावसायिकांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. तसेच कामांमध्ये अनेक त्रुटी निर्माण होत असल्याने संपूर्ण शहरालाच ही कामे नको, अशी अवस्था निर्माण झाल्याने लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून संताप व्यक्त करून ठेकेदारांच्या कामगारांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्याने ठेकेदारांनी काम न करण्याची भूमिका घेतली होती.

सराफ बाजार, दहीपूल तसेच मेनरोड, बागवानपुरा, खडकाळी, नानावली, कमोद गल्ली आदी भागांत कामे करताना अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. ठेकेदारांकडून कामे केली जात नसल्याने काही दिवसांपासून कामे ठप्प झाली आहेत. माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी स्मार्ट सिटी कंपनीकडे विचारणा केल्यानंतर काम करण्यास ठेकेदार तयार नसल्याचे सांगण्यात आले असता त्यांनी कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीने पोलिसांशी संपर्क साधून संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यावर आता पोलिसांचे नियमित पेट्रोलिंग करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button