Nashik Igatpuri : इगतपुरी तालुका जलमय, भावली ओव्हरफ्लो ; शेतीकामे मात्र ‘स्लो’ | पुढारी

Nashik Igatpuri : इगतपुरी तालुका जलमय, भावली ओव्हरफ्लो ; शेतीकामे मात्र ‘स्लो’

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, अतिवृष्टीने तालुका जलमय झाला आहे. भावली धरण 100 टक्के भरले असून दारणा, कडवा ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. मोठे व मध्यम धरण प्रकल्पात पाण्याची भरमसाट वाढ झाली असून दारणा, कडवा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. जुलैच्या पंधरा दिवसांतच इगतपुरी तालुक्यात एकूण पावसाच्या सरासरी 60 टक्के पाऊस हा विक्रमच मानला जात आहे. आतापर्यंत 2 हजार मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीच्या कामांनाही ब्रेक लागला आहे. भात पिके पाण्याखाली गेली असून, नदीपात्रालगतची बहुतांश भात रोपे वाहून गेल्याचीही माहिती आहे. अद्यापही भात बियाणे व रोपे पाण्याखाली असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पिकांचा पंचनामा करण्याची मागणी शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांनी केली आहे.

इगतपुरी तालुक्यात धरणांच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दारणा, कडवा धरणातून गेल्या पाच-सहा दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातून सद्यस्थितीत 10,670 क्यूसेक विसर्ग सुरू असून, 65.76 टक्के साठा संचित झाला आहे. कडवा प्रकल्पात 3,233 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, 69.91 टक्के साठा संचित आहे. तर वैतरणा धरणातून 400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भावली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

इगतपुरी तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. मुसळधार पाऊस, हिरवेगार रान, दाट धुके, डोंगरकड्यांवरून झेपावणारे शुभ्र जलप्रपात असा नयनरम्य नजारा भावलीसह परिसरात पाहावयास मिळतो. यंदा जोरदार पावसामुळे वेळेत मुबलक पाणीसाठा झाला असून, परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. तालुक्यातील भावली धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले. पावसाचा जोर कायम राहिला तर उर्वरित धरणेही लवकरच भरतील, अशी अपेक्षा आहे.

चोवीस तासांत 172 मिमी बरसला पाऊस
गेल्या आठ ते दहा दिवसांपासूनच्या इगतपुरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, आठ-दहा दिवसांत जवळपास 1000 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.शुक्रवारी (दि. 15) 24 तासांत 172 मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात वार्षिक एकूण सरासरीच्या 60 टक्केपेक्षा जास्त पाऊस अवघ्या 15 दिवसांत झाल्याने जनतेला व शेतकर्‍यांना आता पावसाच्या उसंतीची अपेक्षा आहे.

धरणाचे नाव      जलसाठा टक्केवारी      शुक्रवारचा साठा (दलघफू)               पाऊस मिमीमध्ये
दारणा                     65. 76 टक्के                    4901                                    35
भावली                   100 टक्के                         1434                                   225
मुकणे                    72. 66 टक्के                     5260                                    17
कडवा                    69. 91 टक्के                     1180                                    34
वाकी                     39. 93 टक्के                     995                                      93
भाम                     73. 34 टक्के                   1860                                      75
वैतरणा                 70. 1 टक्के                 232. 20 (दलघमी)              एकूण 970 मिमी

हेही वाचा :

Back to top button