धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता | पुढारी

धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळ्याच्या महापौर पदावर पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महापौरपदावरून कर्पे यांना पायउतार व्हावे लागले होते. मात्र, त्यानंतर महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींनी पुन्हा कर्पे यांनाच या पदावर संधी देण्याची निश्चित केले आहे. आज त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर होणार आहे.

धुळ्याच्या महापौरपदावर ओबीसी प्रवर्गाच्या जागेवर प्रदीप कर्पे हे गेल्यावर्षी विराजमान झाले होते. मात्र, धुळे महानगरपालिकेच्या ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेल्याने महापौर पदावरून प्रदीप कर्पे यांना पायउतार व्हावे लागले होते. यानंतर धुळ्याच्या महापौरपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. ही जागा सर्वसाधारण प्रवर्गातील नगरसेवकांसाठी आरक्षित झाल्याने महापौर पदाच्या शर्यतीत अनेक दिग्गजांची नावे पुढे येत होती. मात्र, यासाठी खा. डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवकांची मते जाणून घेण्यात आली. यानंतर आज महानगरपालिकेत कर्पे यांनी अर्ज दाखल केला.

यावेळी खा. डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, मनपा स्थायी समितीचे सभापती शितलकुमार नवले तसेच माजी महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक हिरामण गवळी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. महापौर पदासाठी विरोधी गटाकडून मुदतीत कुणीही अर्ज दाखल केला नाही. तर भारतीय जनता पार्टीकडून प्रदीप कर्पे यांनी तीन अर्ज दाखल केले. त्यामुळे त्यांची निवड ही बिनविरोध होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे .दरम्यान महापौर पदासाठी १९ जुलै रोजी महापालिकेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात येणार आहे. यावेळी प्रदीप कर्पे यांची अधिकृत निवड घोषित केली जाणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button