नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात | पुढारी

नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात गुरुवारी (दि.14) घाटमाथ्याचा भाग वगळता अन्यत्र पावसाचा जोर काहीसा ओेसरला. त्यामुळे मुकणे व वालदेवी धरणांमधील विसर्ग बंद करण्यात आला. तर गंगापूर व दारणासह अन्य प्रकल्पांमधील विसर्गात काही अंशी कपात केली गेली. जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. सर्वदूर झालेल्या या पावसाने धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. मात्र, गुरुवारी (दि.14) नाशिक शहरासह ग्रामीण भागातदेखील पावसाचा जोर काहीसा कमी झाला. शहर व परिसरात सकाळच्या सुमारास काही मिनिटे सूर्यनारायणाचे दर्शन झाले. त्यानंतर दिवसभरात अधुनमधून हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. शहरात सायंकाळी 5 पर्यंत 8.4 मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली. जिल्हयाच्या पश्चिम भाग असलेल्या पेठ, सुरगाणा, इगतपुरी, र्त्यंबकेश्वर, कळवण तसेच दिंडोरी आदी तालुक्यांत पावसाने काहीशी उसंत घेतल्याने जनतेला दिलासा मिळाला. तर उर्वरित तालुक्यांतही दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसाचा जोर कमी होताच प्रमुख धरणांच्या विसर्गातही कपात करण्यात आली.

गंगापूर धरणाचा विसर्ग सायंकाळी 7 ला 7128 क्यूसेकपर्यंत करण्यात आला. गंगापूरमधील विसर्गात घट केल्याने गोदाघाटावरील पूरपरिस्थिती काहीशी नियंत्रणात आली आहे. तर दारणामधून 10 हजार 670 क्यूसेक विसर्ग केला जात आहे. याशिवाय आळंदीतून 687, कडवातून 3233, पालखेडमधून 8856 तसेच नांदूरमध्यमेश्वरमधून 53 हजार 815 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कमी झाल्यास विसर्गात मोठ्या प्रमाणात कपात केली जाऊ शकते.

दिवसभरातील पर्जन्य
पाउस मिमी
त्र्यंबकेश्वर 51
गंगापूर 25
गौतमी 80
काश्यपी 15
अंबोली 62
दारणा 19
भावली 120

हेही वाचा :

Back to top button