

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : मालेगाव शहराला लागून वाहणाऱ्या गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करीत सूर मारलेल्या युवकाचा चार दिवसानंतर मृतदेह सापडला. त्या मृतदेहाबरोबर स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नदी काठावर रुग्णवाहिकेची व्यवस्था न करता थेट दुचाकीवरून हा मृतदेह सामान्य रुग्णालयातील शवागारापर्यंत नेण्यात आला. याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
हंगामातील पहिला पूर आल्याने अनेकांना त्यात डुबक्या मारण्याचा मोह अनावर होतो. हाच प्रकार नईम अहमद मो. अमीन (वय 23) या तरुणाच्या जीवावर बेतला. बकरी ईदची सुट्टी साजरी करताना तो मित्रांसोबत बुधवारी (दि.13) सायंकाळी गिरणा पुलावर गेला होता. तेव्हा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरुन वेगाने पाणी वाहत होते. मित्र मोबाईलवर शुटिंग करीत असताना नईम पुलाच्या कठड्यावर उभा राहिला आणि क्षणात त्याने नदीपात्रात सूर मारला. या घटनेकडे उत्सुकतेने पाहणाऱ्यांचा काहीवेळातच काळजाचा ठोका चुकला. नईम पुन्हा दिसलाच नाही. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तीन दिवस नदीकाठच्या परिसरात शोधमोहीम राबवूनही हाती काहीच लागले नाही.
चौथ्या दिवशी सवंदगाव शिवारातील ओवाडी नाला परिसरात जाळ्यात अडकलेला मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला. एव्हाना सर्वांनाच नईम नदीत बेपत्ता असल्याची माहिती होती. त्याठिकाणी परिचित, आप्त पोहोचले. मृतदेह अडचणीच्या ठिकाणी होता. पण प्रयत्न करून तो बाहेर काढण्यात आला. दरम्यान, रस्ता सुद्धा पावसाने खराब झाला असल्याने त्याठिकाणी रुग्णवाहिकेची येऊ शकत नव्हती. त्यामुळे वाट न पाहता काही युवकांनी थेट दुचाकीवर मृतदेह ठेवून तो सामान्य रुग्णालयात आणला. हा मृतदेह दुचाकीवरून आणतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वास्तविक रुग्णवाहिका पोहोचेल तिथे पर्यंत स्ट्रेचर अथवा डोली करुन मृतदेह आणणे शक्य नव्हते का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. दोन दिवसांपूर्वीच साल्हेर किल्ल्यावरून पडून जखमी युवकाला अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पाठीवर बसवून खाली उतरवले होते आणि मृत तरुणाला ही योग्य पद्धतीने अवघड डोंगरावरून पोलिस आणि स्थानिकांनी खाली आणत रस्त्यावर रुग्णवाहिका सज्ज ठेवल्याचे उदाहरण ताजे असताना महानगर असलेल्या मालेगावात पाण्यात फुगलेल्या पार्थिव देहाला दुचाकीवरून नेण्याचा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.