नाशिक शहरात पंधरा दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू | पुढारी

नाशिक शहरात पंधरा दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील राजकीय घडामोडी, आगामी धार्मिक सण-उत्सव यासह विविध संघटनांकडून होणारी निदर्शने, आंदोलने यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दि. 13 ते दि. 27 जुलैदरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार मनाई आदेश लागू केले आहेत.

शिवसेना समर्थक व बंडखोर आमदार समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन, आंदोलनाची शक्यता, त्याचप्रमाणे देशात काही व्यक्तींकडून जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली जात असल्याने त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. त्याचप्रमाणे आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी यासाठी पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी शहरात पंधरा दिवस मनाई आदेश लागू केले आहेत. त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही. दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बाळगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे प्रतीकात्मक प्रेताचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही. आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 चे कलम 135 नुसार शिक्षेस पात्र राहतील, असा इशारा पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button