पावसाने सप्तशृंगीगडावरील भिंत कोसळली ; 4 भाविकांसह 2 लहान मुले गंभीर जखमी | पुढारी

पावसाने सप्तशृंगीगडावरील भिंत कोसळली ; 4 भाविकांसह 2 लहान मुले गंभीर जखमी

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा

सप्तशृंगगडावर गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे. आज (दि. 11) दुपारी 3 वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसामुळे सप्तशृंगी मंदिरातील परतीच्या मार्गावरील संरक्षक भिंतीवरील दगड, माती वाहून आल्याने  4 भाविक व 2 लहान मुले खाली कोसळून गंभीर जखमी झाले. देवी संस्थानच्या दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून यामध्ये दोन महिला, दोन पुरूष व दोन लहान मुलांचा समावेश आहे.

परतीच्या मार्गावरील डोंगरावरून मोठ्या प्रमाणावर पाऊस येत असल्याने या पाण्याचा जोर वाढल्यामुळे हे पाणी  संरक्षण भितीवरून मोठ्या प्रमाणात वाहु लागल्याने ही भिंत कोसळून पायरीवर मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागले.  यावेळी भाविक हे पायरी उतरत असतांना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पायरीवरुन वाहत गेले. या घटनेत भाविकांच्या डोक्यावर व हात-पायाला गंभीर इजा झाली.

याबाबत  देवी संस्थान चे कर्मचारी व स्थानिक व्यापारी यांना समजल्याबरोबर  तातडीने भाविकांवर  देवी संस्थानच्या दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. या घटनेत निबाबाई नानु नाईक (45) रा. एंरडोल,  अशिष तांरगे (23) रा. नागपुर, मनिष राऊत (32) रा. नागपूर, पल्लवी नाईक (3) रा. एरडोल, शैला आव्हाड ( 7) यांना पुढील उपचारासाठी वणी येथे पाठविण्यात आले आहे.  डाॅ. धनश्री घोडके, निशा गायकवाड, कंपाउंडर शाताराम बेनके यांनी जखमींवर उपचार केले.

Back to top button