नाशिक जिल्ह्यातील साडेसात लाख घरांवर फडकणार तिरंगा, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जय्यत तयारी | पुढारी

नाशिक जिल्ह्यातील साडेसात लाख घरांवर फडकणार तिरंगा, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जय्यत तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सर्व शासकीय कार्यालयांनी जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.7) ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासंदर्भात नियोजन बैठक पार पडली. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. प्रकाश देशमुख, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. संजय नेरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, खादी व ग्रामोद्योग अधिकारी सुधीर केंडाळे यांच्यासह संबधित यंत्रणांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले की, जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय-निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी व शैक्षणिक संस्था, शाळा- महाविद्यालये यांच्यासह शहरातील नगरपंचायती व ग्रामपातळीवर ग्रामपंचायती यांचाही उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा आहे. त्याद़ृष्टीने सर्व यंत्रणांनी आपल्या स्तरावर उपक्रमाबाबत प्रभावीपणे जनजागृतीच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील आवश्यक घरांची संख्या लक्षात घेत स्थानिक विक्रेते व पुरवठादारांशी संपर्क करून तिरंगा ध्वज खरेदीचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे महिला बचतगटांनाही उपाययोजना कराव्या, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

साडेसात लाख घरांवर तिरंगा फडकवणार : बनसोड
लीना बनसोड यांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात 7.50 लाख घरांवर तिरंगा फडकविण्याचा संकल्प आहे. शहरी भागातही उपाययोजना व जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची आहे. शाळा व महाविद्यालय स्तरावर उपक्रमाबाबत चर्चासत्र, स्पर्धा, शिबिरे घेत जनजागृती केल्यास राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने खरेदी करण्यासाठी विद्यार्थी नक्कीच सहभागी होतील, असा विश्वास बनसोड यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button