Shiv Sena : सेनाप्रमुखांच्या ‘त्या’ अटक नाट्याबाबत भुजबळांनी सोडले मौन, म्हणाले… | पुढारी

Shiv Sena : सेनाप्रमुखांच्या ‘त्या’ अटक नाट्याबाबत भुजबळांनी सोडले मौन, म्हणाले...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरांवर महाविकास आघाडीकडून सातत्याने आरोप होत असल्याने बंडखोर आमदारांसह भाजपकडूनही त्यास प्रत्युत्तर देत छगन भुजबळांचे बंड आणि शिवसेनाप्रमुखांना झालेल्या अटकेबाबतचा मुद्दा समोर आणला जात आहे. यामुळे कोंडीत सापडलेल्या भुजबळांना अखेर शुक्रवारी (दि. 8) पत्रकार परिषद घेत बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेबाबत मौन सोडत स्पष्टीकरण द्यावे लागले.

एकनाथ शिंदे यांच्यासह इतरही आमदारांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने बंडखोर म्हणून हिणवले जात असल्याने आता बंडखोरांकडूनही आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. हिंदुत्वाशी फारकत असलेल्या दाऊदशी संबंध असलेले आणि शिवसेनाप्रमुखांना अटक करणार्‍या पक्षाबरोबर असलेली आघाडी शिवसेनेने तोडावी, अशी मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. तसेच शिवसेनेतून 18 आमदार घेऊन बाहेर पडलेल्या भुजबळांचे बंड नव्हते का? असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याने त्यावर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले.

भुजबळ म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंपासून दूर का गेलो? याची कारणे बंडखोरांकडून दिली जात असली तरी त्यांची स्वत:च्या बंडखोरीबाबतची कारणे सातत्याने बदलली जात आहेत. बेळगाव आंदोलनाच्या एका तुकडीच्या नेतृत्वाची धुरा बाळासाहेबांनी माझ्याकडे सोपविली होती. अनेक आंदोलनांत मला अटकही झाली. शिवसेना वाढविण्याचे काम मी मनापासून केले. मंडल आयोगाच्या शिफारशीवरून माझे आणि बाळासाहेबांचे मतभेद झाले आणि त्यावरून आपण 18 आमदार घेऊन बाहेर पडून शिवसेनेचा ब गट तयार केला. त्यातील सहा लोक परत गेले. आम्ही 12 आमदार राष्ट्रवादीत सामील झालो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पोलिस कोठडी आणि अटक करायची नाही, असे आदेश दिले होते. जामीन मिळत असेल तर मिळू द्यायचा, असे ठरले होते. त्यानंतर त्यांना सात दिवसांची कोठडी मिळाली.

मात्र, मातोश्री येथेच त्यांना ठेवले होते. अब्रूनुकसानीसंदर्भातील दाखल केलेल्या केसचा निकाल लागण्याच्या टप्प्यावर असताना संजय राऊत व इतर लोक माझ्याकडे आले होते. त्यांना काय म्हणायचे मी समजून गेलो आणि खटल्याच्या तारखेला न्यायालयासमोर उभे राहून मला ही केस मागे घ्यायची आहे, अशी न्यायमूर्तींना अनेकदा विनंती केली. त्यानंतर केस काढून टाकण्यात आल्याची कबुली भुजबळांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा :

Back to top button