Sanjay Raut : आमच्याविरोधात बोलण्यासाठी भाजपला 40 भोंगे मिळाले

Sanjay Raut : आमच्याविरोधात बोलण्यासाठी भाजपला 40 भोंगे मिळाले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या सर्वच आमदारांकडून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत टीकेचे धनी बनत आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यांच्याकडूनही या आमदारांवर तिखट शब्दांत बाण सोडले जात असल्याचे नाशिक येथे पाहावयास मिळाले. नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. 8) पत्रकार परिषदेत राऊत यांनी आमच्याविरोधात बोलाण्याकरिता भाजपला 40 भोंगे मिळाल्याचे सांगत बंडखोर आमदारांची पुन्हा एकदा खिल्ली उडवली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 39 सहकार्‍यांसह शिवसेनेसमोर आव्हान उभे करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेमुळे नवी मुंबई, ठाण्यासह काही ठिकाणच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकारीदेखील शिंदे गटात सामील होत आहेत. यामुळे महापालिकांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेच्या चिंतेत वाढ झाली असून, ही फाटाफूट रोखण्यासाठी शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात जाऊन डॅमेज कंट्रोल करावे लागत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणून जबाबदारी असलेल्या नाशिकच्या दौर्‍यावर आले आहेत.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, शिवसेनेतून काही आमदार बाहेर पडले असले तरी शिवसेनेला फरक पडलेला नाही आणि पडणारही नाही. सध्या कृत्रिम धुरळा उठला आहे, तो काही दिवसांनी शांत होईल आणि शिवसेना पुन्हा नव्या जोमाने कामाला लागेल. बंडखोर आमदारांना काय बोलायचे ते बोलू द्या. सध्या भाजप काही बोलत नाही. कारण त्यांना आमच्याविरोधात बोलण्याकरता 40 भोंगे मिळाल्याची तिखट प्रतिक्रिया राऊतांनी देत बंडखोरांवरील आपला राग व्यक्त केला. राऊतांमुळे शिवसेना संपतेय, असा आरोप केला जात असल्याबद्दल राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले की, शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी आधी हिंदुत्वाचे कारण पुढे केले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून निधी दिला जात नाही आणि आता माझे कारण पुढे करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे एकही ठोस कारण नाही आणि त्यावर ते ठाम नसल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. भाजपला महाराष्ट्रापासून मुंबई स्वतंत्र करायची आहे.

महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे आहेत आणि हे शिवसेना असेपर्यंत शक्य नाही. त्यामुळे भाजपकडूनच बंडखोर आमदारांना शिवसेनेला संपवण्याची सुपारी दिल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. शिवसेना आणि त्याचे चिन्ह धनुष्यबाण हे आमचेच आहे. त्यांनी पक्ष सोडल्याचे सांगावे, असे बंडखोरांना आव्हान देत शिवसेनेबरोबर लढण्यासाठी त्यांना शिवसेनाच हवी असल्याने आपापसात शिवसैनिकांना लढविण्याचे प्रयत्न सुरू असून, त्याबाबत आम्ही सावधगिरी बाळगून असल्याचे राऊत यांनी नमूद केले.

नाशिक शिवसेनेसोबत

नाशिक शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी व माजी नगरसेवक हे शिवसेनेबरोबरच आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. स्थापन झालेले सरकार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा करत राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news