धुळे : शिरपूर व दोंडाईचा नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर; १८ ऑगस्टला मतदान | पुढारी

धुळे : शिरपूर व दोंडाईचा नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर; १८ ऑगस्टला मतदान

धुळे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील निवडणुकांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आणि शिरपूर नगर परिषदेच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन्ही नगरपरिषदांसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान तर दुसऱ्या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि दोंडाईचा नगरपरिषदांचा कालावधी २८ डिसेंबर २०२१ रोजी संपला होता. त्यानुसार या दोन्ही नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकी संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने या दोन्ही नगरपरिषदांच्या जागांचे आरक्षण आणि इतर सर्व कार्यवाही पूर्ण करण्यात आली होती.

आज (दि.८) राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून २० जुलै रोजी निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्यानुसार नामनिर्देशन पत्र २२ जुलैपासून  ते २८ जुलैपर्यंत भरता येणार आहे. या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे. या नामनिर्देशन पत्रांची छाननी आणि वैध उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठीची अंतिम मुदत ०४ ऑगस्टपर्यंत देण्यात आलेली आहे. मतदान १८ ऑगस्ट रोजी तर मतमोजणी १९ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेपासून केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शिरपूर नगरपरिषदेवर यापूर्वी भाजपाचे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखालील गटाची सत्ता होती. या नगर परिषदेवर थेट नगराध्यक्ष म्हणून जयश्रीबेन अमरीशभाई पटेल यांची नियुक्ती झाली होती. तर दोंडाईचा नगरपरिषद देखील भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांच्या अधिपत्याखाली होती. या नगर परिषदेमध्ये देखील राज्याचे माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुवरताई रावल या थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून गेल्या होत्या.

हेही वाचा 

Back to top button