Nashik Zilla Parishad : निरक्षर माजी सदस्याचा नऊ लाखांचा निधी पळवला | पुढारी

Nashik Zilla Parishad : निरक्षर माजी सदस्याचा नऊ लाखांचा निधी पळवला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील नामपूर गटाचे भाजपचे माजी सदस्य कान्हू गायकवाड यांच्या निरक्षर असल्याचा फायदा घेत ‘सेस’ निधी बनावट पत्राच्या आधारे पळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांनी दिलेले पत्र आणि बनावट पत्रावरील अंगठ्याची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने निधी पळवल्याचा आरोप त्यांनी केला.

जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ दि. 21 मार्च 2022 रोजी पूर्ण झाला. तोपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांच्या सेसबाबत घेण्यात आलेला निर्णय रद्द करून प्रशासनाने नव्याने निधी नियोजन केले होते. नवीन नियोजनामध्ये प्रत्येक सदस्याला नऊ लाख 20 हजार रुपये निधी देण्यात आला होता. यासाठी संबंधित विभागांना सदस्यांकडून कामे सुचवणारे नवीन पत्र घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, नामपूर गटाचे माजी सदस्य कान्हू गायकवाड हे निरक्षर असल्यामुळे त्यांच्या नावाने बनावट पत्र तयार करून त्यावर अंगठा टेकवून तो निधी एका ठेकेदारानेच लाटल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.

गायकवाड यांनी अंबासन गावातील तीन रस्त्यांची कामे सुचवली होती. त्यांनी बांधकाम विभागाकडे पत्र दिल्यानंतर, तुम्ही यापूर्वीच पत्र दिले असून, त्यानुसार नियोजन केल्याची माहिती कार्यकारी अभियंता यांना दिली. त्यावर गायकवाड यांनी, हे पत्र आपले नसून, त्यावरील अंगठाही खोटा असल्याची तक्रार केली. दाद मिळत नसल्याने गायकवाड यांनी थेट बनसोड यांची भेट घेऊन कैफियत मांडली. बनावट पत्र कुणी दिले, याचा शोध आता प्रशासनाकडून घेतला जात आहे.

माझ्या नावाने बनावट पत्र तयार करून ते प्रशासनाला दिले. त्या पत्राच्या आधारे माझ्या विरोधकांच्या गावात ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. पहिल्या पत्रावर माझाच अंगठा उमटवलेला असेल, तर मी माझी तक्रार बिनशर्त मागे घेईन. पण तसे नसेल, तर माझ्या पत्रावरील कामे ग्राह्य धरावीत.
– कान्हू गायकवाड,
माजी सदस्य, नामपूर

हेही वाचा :

Back to top button