नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी | पुढारी

नाशिक : हजार एकर भूसंपादनाची एमआयडीसीकडून तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात उद्योगांना असलेले पोषक वातावरण बघता, नाशिकमध्ये गुंतवणुकीकडे नव्या उद्योगांचा कल वाढत आहे. मात्र सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील बहुतांश औद्योगिक वसाहतींमध्ये भूखंडच शिल्लक नसल्याने, नव्या उद्योगांना भूखंड उपलब्ध करून देण्याचे आव्हान एमआयडीसीसमोर आहे. अशात एमआयडीसीने शहराजवळील तीन ठिकाणी एक हजार एकर भूसंपादन करण्याचे नियोजन केले असून, सध्या त्याची जोरदार तयारी सुरू आहे.

एमआयडीसीने दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील मापारवाडी, दिंडोरी तालुक्यातील जांबुटके आणि नाशिक तालुक्यातील राजूरबहुला या भागात भूसंपादनाची तयारी सुरू केली आहे. त्यातही राजूरबहुला या भागातील शेतकर्‍यांनी नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी दिल्यास राजूरबहुला हे उद्योगांसाठी हॉट डेस्टिनेशन ठरण्याची शक्यता आहे. सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत सध्या उद्योगांना जागाच उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यातील इतर भागांमध्ये एमआयडीसी उभी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी एमआयडीसीने दिंडोरी तालुक्यातील तळेगाव अक्राळे येथे 337 हेक्टरवर औद्योगिक वसाहत विकसित करण्याचे नियोजन केले होते. त्यापैकी 206 हेक्टर जमिनीचे संपादन केले असून, या ठिकाणी नव्या उद्योगांना भूखंड उपलब्ध करून देण्याचे नियोजनसुद्धा सुरू केले आहे.

गेल्या वर्षीच या ठिकाणी रिलायन्स ग्रुपचा रिलायन्स लाइफ सायन्सेस हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आला. या प्रकल्पाने नाशिकमध्ये 2,100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्याचबरोबर इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेदेखील या ठिकाणी 350 कोटींची गुंतवणूक केली. तसेच इतरही गुंतवणुकीचा ओघ सुरूच असून, या ठिकाणी भूखंडांसाठी आता स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे नव्या उद्योगांना भूखंड उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान एमआयडीसीसमोर निर्माण झाले आहे. दरम्यान, जागेची वाढती मागणी लक्षात घेता, नव्या औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीकडून नियोजन सुरू आहे. त्यात, सिन्नरच्या मापारवाडी, दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे आणि मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या राजूरबहुला परिसरात भूसंपादन केले जाणार आहे. मापारवाडी आणि जांबुटके येथे पहिल्या टप्प्यात भूसंपादन होऊ शकेल, तर राजूरबहुला शेवटच्या टप्प्यात असेल.

असे करणार भूसंपादन
जांबुटके, दिंडोरी – 31.51 हेक्टर
मापारवाडी, सिन्नर – 230.67 हेक्टर
राजूरबहुला, नाशिक – 144.43 हेक्टर

जिल्ह्यात जांबुटके, मापारवाडी, राजूरबहुला या तीन ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच उद्योगांची गुंतवणूक यावी, याकरिता जमीन उपलब्ध होऊ शकणार आहे. नव्या उद्योगांच्या गुंतवणुकीचा कल नाशिककडे वाढत असून, जागेची उपलब्धता लक्षात घेत हे नियोजन करण्यात येत आहे.
– नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

हेही वाचा :

Back to top button