जळगाव मनपातील 6 नगरसेवक शिंदे गटात | पुढारी

जळगाव मनपातील 6 नगरसेवक शिंदे गटात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
येथील महापालिकेतही सत्तासंघर्ष होऊन भाजपमधून 27 नगरसेवकांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी हात दिला. त्यामुळे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली. पाठिंबा देणार्‍या सहा नगरसेवकांनी आता शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी पाठिंबाही व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रातून जळगावातील नगरसेवकांची ही पहिलीच फाटाफूट आहे.

जळगाव महापालिकेत भाजपमधून शिवसेनेला पाठिंबा देणारे नगरसेवक अ‍ॅड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, प्रतिभा देशमुख, ज्योती चव्हाण, रेश्मा काळे, चेतन सनकत व कार्यकर्ता हर्षल मावळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. तसेच त्यांनी ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या समवेत अंबरनाथ येथील नगरसेवक सुनील चौधरीदेखील उपस्थित होते.

आणखी नगरसेवक संपर्कात नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सांगितले की, आम्ही भाजपतून बाहेर पडलो, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. आज सहा नगरसेवक असलो तरी फुटीर गटासह अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आम्ही खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली, आमच्यावर अपात्रतेची सुनावणी विभागीय आयुक्तांकडे सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, त्यामुळे आता यापुढे त्यांच्याकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. त्यावर खासदार शिंदे यांनीदेखील लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे.

Back to top button