अग्निपथ वादामुळे जळगाव जिल्ह्यात यंत्रणा अलर्ट ; रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरुप | पुढारी

अग्निपथ वादामुळे जळगाव जिल्ह्यात यंत्रणा अलर्ट ; रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरुप

जळगाव : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. उत्तर भारतापाठोपाळ जळगाव जिल्ह्यातही या आंदोलनाचे लोन पसरले आहे. अमळनेर आणि जळगाव शहरातही आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली असून, जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवर लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा वाढविली आहे.

‘अग्निपथ’ योजनेला देशभरात तीव्र विरोध होऊ लागला आहे. या योजनेविरोधात अनेक राज्यांमध्ये जोरदार निदर्शने होत आहेत. बिहारमध्ये आंदोलकांकडून रेल्वेगाड्या पेटविल्या आहेत. आता आंदोलनाचे हे लोन जळगाव जिल्ह्यातही पसरले आहे. अमळनेरनंतर जळगाव शहरातही या योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. याची गांभीर्याने दखल घेऊन रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या समोरील परिसर तसेच मागच्या बाजूने आणि आतील सर्व रेल्वे स्थानकावरील सुरक्षेत वाढ करुन, फलाटावर सुरक्षेच्या कारणातून बंदोबस्त वाढविला आहे.

… समस्यानगरीच म्हणावे लागेलः ना. काळे

संशयास्पद हालचालींवर नजर
रेल्वे स्थानकावर पोलिस कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तात तैनात केले आहे. सर्व प्रकारच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर ठेवली जात आहे. अग्निपथ आंदोलनाची धग जिल्ह्यातही पोहचण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात येऊन पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेगाड्यांसह स्थानक परिसरात आजपासून बंदोबस्तात वाढ केली आहे. प्रवाशांसह स्थानकांवर येणाऱ्यांवर पोलिसांची नजर होती. वरिष्ठांच्या आदेशावरून उत्तर भारतातील अलर्ट प्राप्त झाल्यामुळे रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढविली आहे. रात्री पेट्रोलिंग वाढविण्यात आली असल्याचे लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी सांगितले.

महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रातील ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार’

जिल्ह्यात अतिरिक्त बंदोबस्त वाढविला
आंदोलनाचे गांभिर्य लक्षात घेता, जिल्ह्यात लोहमार्ग पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. भुसावळ स्थानकावर आज सकाळी जीआरीपी आणि आरपीएफ पथकाकडून पथसंचलन काढण्यात आले. तसेच याठिकाणी ३ अधिकारी व २६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर जळगाव स्थानकावर ५ अधिकारी, ३७ कर्मचारी आणि स्थानिक आरसीपीचे २० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर सावदा, निंभोरा आणि रावेर स्थानकावर २ अधिकारी, १० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. यासह रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालक, खाद्य पदार्थ विक्रेते आणि कुली यांची पोलिसांनी बैठक घेऊन त्यांनाही संशयास्पद घटना दिसल्यास गोपनीय पथकाकडे कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button