स्मार्ट कार्ड योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ | पुढारी

स्मार्ट कार्ड योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनापाठोपाठ कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ घेता आला नाही. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्मार्ट कार्ड योजनेला 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणार्‍या हजारो ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 विविध सामाजिक घटकांना 33 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना आधारकार्ड क्रमांकाशी निगडित असलेले स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. पण, कोरोनात प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच कर्मचारी संपामुळे आगार बंद राहिल्याने योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सध्या एसटी महामंडळाच्या 250 आगारांमध्ये तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खासगी वितरकामार्फत ज्येष्ठ नागरिकांना आधार क्रमांकाशी संलग्न असलेली स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. जूनअखेर जुन्या पद्धतीनुसारच ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. 1 जुलैपासून ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक राहणार आहे.

Back to top button