Nashik: मखमलाबादच्या मातीत उद्या रंगणार कुस्त्यांची दंगल, ‘इतक्या’ लाखांचा इनाम

file photo
file photo

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
मखमलाबाद तालिम फाऊंडेशन, मखमलाबाद आणि जय बजरंग तालीम संघ, नाशिक यांच्या वतीने मखमलाबादच्या मातीत गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी (दि.२) राज्यस्तरीय निकाली कुस्त्यांची भव्य दंगल रंगणार आहे.

आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या प्रेरणेने आणि नाशिक शहर तालिम संघाचे उपाध्यक्ष तथा मखमलाबाद विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष पहिलवान वाळू काकड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २२ वर्षांपासून मखमलाबादच्या मातीत या भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन केले जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, शासनाने नियमही शिथिल केले आहेत. तसेच अनेक कुस्तीप्रेमी आणि पाहिलवानांच्या आग्रहानंतर यंदा मखमलाबाद येथील मराठा मंगल कार्यालयासमोरील मैदानात गुरुवारी सायंकाळी ४ ते ९ या वेळेत या निकाली कुस्त्यांच्या भव्य दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कुस्तीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकमधूनही पहिलवान हजेरी लावणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार ऍड. राहुल ढिकले, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर अशोक मुर्तडक, शिवसेना उपनेते सुनील बागूल, आनंद सोनवणे, माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, माजी सभागृह नेते कमलेश बोडके, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, दामोदर मानकर, पुंडलिक खोडे, खंडू बोडके, बाळासाहेब पालवे, नाशिक शहर तालीम संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण, महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद सदस्य हिरामण वाघ, उद्योजक बुधाशेठ पानसरे, बापू पिंगळे, परेश ठक्कर, दीपक हांडगे, राजूनाना पाटील व मखमलाबादमधील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन कुस्तीचा आनंद लुटावा आणि नावाजलेल्या पाहिलवानांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक वाळू काकड यांनी केले आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पहिलवान भरत काकड, संदीप निकम, पंडित काकड, भूषण काकड, योगेश पिंगळे, ऋतिक तांबे, सचिन पिंगळे, उत्तम पिंगळे, संजय पिंगळे, शुभम वाकोडे, सागर गायकवाड आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तसेच, मखमलाबाद ग्रामस्थ आणि मित्र परिवाराचेही या कुस्ती स्पर्धेसाठी सर्व प्रकारचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती वाळू काकड यांनी दिली.

महाराष्ट्र केसरी उपविजेत्यांमध्ये होणार मानाची कुस्ती

मानाची कुस्ती महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपविजेते प्रकाश (विशाल) बनकर विरुद्ध अक्षय शिंदे या दोन उपविजेत्यांमध्ये होणार आहे. या कुस्तीला तब्बल दोन लाख रुपयांचा इनाम ठेवण्यात आला आहे. यानंतर नाशिकच्या वाळू बोडके विरुद्ध कोल्हापूरच्या सागर चौघुले यांच्यात होणाऱ्या कुस्तीला ५१ हजारांचा इनाम ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र चॅम्पियन संदीप निकम (मखमलाबाद, नाशिक) विरुद्ध राजू कलमट्टी (कर्नाटक), विकी मोरे (भगूर, नाशिक) विरुद्ध ऋषिकेश शेळके (कर्जत) यांच्यात होणाऱ्या दोन्ही कुस्त्यांमधील विजेत्यांना प्रत्येकी २१ हजार, तर देविदास टेकनर (रोकडोबा तालिम, नाशिक) विरुद्ध संदीप बोडके (साकुर फाटा, नाशिक), किरण थेटे (दुगांव, नाशिक) विरुद्ध मुकेश चौधरी (मालेगांव, नाशिक), नामदेव दिवे (साकुर फाटा, नाशिक) विरुद्ध सुनील अहिरे (उद्याने, सटाणा), उदय काकड (मखमलाबाद, नाशिक) विरुद्ध अजित शेख (मालेगाव, नाशिक) या तिन्ही कुस्त्यांमधील विजेत्याला प्रत्येकी ११ हजारांचा इनाम ठेवण्यात आला आहे. भूषण पाटील (साकुर फाटा, नाशिक) विरुद्ध ताऊर खान (मालेगांव, नाशिक) यांच्यातील विजेत्याला सात हजारांचा इनाम तर सार्थक नागरे (पिंपळगाव बहुला, नाशिक) विरुद्ध माऊली गायकवाड (औरंगाबाद) यांच्यात होणाऱ्या कुस्तीतील विजेत्याला प्रत्येकी पाच हजारांचा इनाम आहे. याव्यतिरिक्तही विविध गटांतील कुस्त्या होणार आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news