नाशिक : वावरे गल्लीजवळ घरास भीषण आग; अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण | पुढारी

नाशिक : वावरे गल्लीजवळ घरास भीषण आग; अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मेनरोडवरील मधुकर चित्रपटगृहाच्या पाठीमागील बाजूस वावरे गल्लीजवळ लाकडी घरास आग लागल्याची घटना शनिवारी (दि.28) सायंकाळच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अरुण गोविंद निखळे यांची चार खोल्यांची चाळ आहे. या चाळीला लागून प्रकाश कांडप यंत्र व शेजारी काजवे कुटुंबीयांचे घर आहे. शनिवारी (दि.28) 4.30 च्या सुमारास अचानक निखळे यांच्या दोन क्रमांकाच्या खोलीतून आग व धुराचे लोट येण्यास सुरुवात झाली. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच आरडाओरड झाली. यामुळे कांडप यंत्रातील महिला, पुरुष कामगारांसह काजवे कुटुंबीयांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. परिसरातील तरुणांनी पाणी फेकून आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र जुनी लाकडी घरे असल्यामुळे लाकडांनी क्षणार्धात पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव अग्निशमन मुख्यालयातून दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. वावरे गल्लीतून या बंबांच्या सहाय्याने जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. पंचवटी उपकेंद्रातून पुन्हा एक बंब घटनास्थळी मेनरोड येथून दाखल झाला. तेथूनही जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला. अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. आकाशात उंचच उंच धुराचे लोट दिसू लागल्याने आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती. घटनास्थळी भद्रकाली पोलिसांनी बघ्यांची गर्दी दूर केल्याने बचावकार्यातील अडथळा काहीसा दूर झाला. आगीचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button