नाशिक : संतप्त महिलांचा पाणीटंचाईविरोधात रास्ता रोको, दोन तास वाहतुक झाली ठप्प | पुढारी

नाशिक : संतप्त महिलांचा पाणीटंचाईविरोधात रास्ता रोको, दोन तास वाहतुक झाली ठप्प

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त असलेल्या संतप्त महिलांनी हंडे घेऊन नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ठाण मांडत रस्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनाने तब्बल दोन तास वाहतुकीचा खोळंबा उडाल्याने पोलिस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले.

नाशिक महापालिका हद्दी लगत असूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने संतप्त झालेल्या तिरडशेत येथील महिला व ग्रामस्थांनी सकाळी सातच्या सुमारास हंडा-कळशी घेऊन रस्त्यावर येत रस्ता रोको केला. माजी आमदार घोलप यांच्या पासून तर आताचे आमदार सरोज आहेर यांच्याकडे मनपाचे पाणी मिळवून द्यावे ही मागणी अनेक वेळा करूनही अद्याप पर्यंत कोणीही या मागणीची दखल घेतली नाही. फक्त मतदानासाठीच या गावचा वापर होतो असाही आरोप संतप्त गावकऱ्यांनी यावेळी केला.

पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिलांना मोठी पायपीट करावी लागत आहे. दिवसभर मोलमजुरी करायची आणि पाण्यासाठी हंडे घेऊन कित्येक किलोमीटर जाऊन पाणी आणायचे हाच दिनक्रम दररोज सुरू आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही परिणाम न झाल्याने अखेर आज सकाळी गावातील महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी हातात हंडे घेऊन थेट नाशिक-त्र्यंबक रस्ता गाठला.  पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला. या आंदोलनामुळे नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलीस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले
आठ दिवसांत पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला.

हेही वाचा :

Back to top button