नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम, वाड्या-वस्त्या पाड्यांवरील आदिवासी बांधवांना हक्काचे धान्य मिळावं यासाठी शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्ह्यात नवीन 16 स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी दिलेली आहे.
माजी आ. चंद्रकांत रघुवंशी कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील दुर्गम भागात गेले असताना अनेक भागांतील वाडे-पाडे-वस्त्यांमध्ये ग्रामस्थांना हक्काचं धान्य मिळत नसल्याची बाब निदर्शनास आली. रघुवंशी यांनी नवीन स्वस्त धान्य दुकानासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून व प्रशासन स्तरावर वेळोवेळी निवेदने देऊन मागणी लावून धरली होती. मागणीची दखल घेऊन जिल्ह्यातील पहाडपट्टीत असलेल्या दुर्गम अतिदुर्गम भागातील त्याचप्रमाणे सरदार सरोवर प्रकल्पाने वेढलेल्या गावांच्या परिस्थितीचा विचार करून आदिवासी भागातील किमान 500 लोकसंख्येची अट शिथिल करून विशेष बाब म्हणून 16 नवीन स्वस्त धान्य दुकानांना शासनस्तरावरून मंजुरी देण्यात आलेली आहे. मंजुरीचे पत्र नुकतेच माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांना प्राप्त झाले आहे. स्वस्त धान्य दुकानांचे सर्व अधिकार हे जिल्हा पुरवठा अधिकार्यांना वर्ग करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये हक्काचं रेशन मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.