धुळे ; पुढारी वृत्तसेवा : मालवाहू ट्रकची महापुरुषाच्या पुतळ्याच्या चबुतरास धडक लागल्याने दोंडाईचा शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे दोंडाईचा शहर बंद असले तरी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शांततेचे आवाहन केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. दरम्यान या प्रकरणात पोलीस प्रशासनाने ट्रक चालकाची चौकशी सुरू केली आहे.
धुळे (Dhule) येथून दोंडाईचाकडे जाणारा एक ट्रक गावाबाहेरील वळणमार्ग असणाऱ्या रस्त्याने न जाता थेट दोंडाईच्या शहरातून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जात होता. या वेळी एका चौकात असलेल्या महापुरुषाच्या पुतळ्याच्या चबुतरास या ट्रकचा धक्का लागला. परिणामी पुतळ्याचे नुकसान झाले, ही बाब निदर्शनास येताच तरुणांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. ही माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने तातडीने मोठा जमाव घटनास्थळाकडे धावून आला. तत्पूर्वी ट्रक चालकाने तेथून पलायन केले होते. दरम्यान जमावाने ट्रकच्या काचेवर दगडफेक करून काचेचे नुकसान केले.
ही माहिती पोलिस प्रशासनाला कळल्याने पोलिस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या पोलिस पथकाने पुतळा सुरक्षित ठिकाणी हलवला. संतप्त जमाव पोलिस ठाण्यात पोहोचला यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले.
यानंतर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आमदार जयकुमार रावल यांच्यासह माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम, प्रशासक सुदाम महाजन यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी नुकसान झालेला पुतळा आणि चबुतरा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली. त्याच प्रमाणे दोंडाईचा शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेले अतिक्रमण तातडीने हटवण्यात संदर्भातील मागणी देखील या वेळी प्रशासनाकडे करण्यात आले. अपघातग्रस्त ट्रक चालक मद्य प्यायला होता का ? ही घटना कशी घडली याबाबत चौकशी सुरू केल्याची माहिती पोलिस प्रशासनाने बैठकीत दिली.
हेही वाचा