धुळे-जळगाव दोन्ही जिल्ह्यांचा पाणीप्रश्न मिटणार? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश | पुढारी

धुळे-जळगाव दोन्ही जिल्ह्यांचा पाणीप्रश्न मिटणार? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले 'हे' आदेश

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई निवारण हेतूने धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा, मालनगाव, लाटीपाडा आणि अनेर धरणातून आरक्षित पाणी साठा सोडण्याचे आदेश धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहे. तत्पूर्वी पाणी संबंधित गावांपर्यंत पोहोच करण्याच्या हेतूने पोलीस आणि पाटबंधारे विभागाने आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. या आवरणामुळे धुळे जिल्ह्यातील एकूण 69 तर जळगाव जिल्ह्यातील 32 अशा एकशे एक गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी मदत होणार आहे.

धुळे जिल्ह्यातील धुळे व शिंदखेडा यासह साक्री तालुका तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे धुळे जिल्ह्यातील प्रकल्पामधील आरक्षित पाणीसाठा सोडण्याची विनंती जळगाव येथील जिल्हाधिकारी तसेच धुळ्याच्या संबंधित यंत्रणेने केली होती. यासाठी जिल्हास्तरीय आकस्मात पिण्याचे पाणी निश्चिती समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये या पाणी टंचाई संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासमोर ठेवण्यात आली. धुळे व शिंदखेडा तालुक्यातील 34 गावांसाठी 543. 889 दलघफू,अमळनेर तालुक्यातील 16 गावांसाठी 106 . 649 दलघफु, असा 650 . 538 दलघफु पाणीसाठा आरक्षित आहे. या पाणीसाठ्यात मधून 300 दलघफु पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली होती. संबंधित यंत्रणेने दिलेल्या अहवालात 350 दलघमी पाणीसाठा सोडण्याची विनंती केलेली असल्याने बैठकीमध्ये जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी हा पाणीसाठा सोडण्याचे आदेश केले आहे.

साक्री तालुक्यातील १६ गावांसाठी मालनगाव प्रकल्पातून 132 57 दलघफु पाणीसाठा आरक्षित असून त्यापैकी पहिले आवर्तन 666.25 दलघफु सोडण्याची आदेश दिले आहेत. तर साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणातून एकोणावीस गावांसाठी 56 .539 दलघफु पाणी सोडण्यात येणार आहे. शिरपूर तालुक्यातील अनेर धरणातून चोपडा तालुक्यातील 16 गावांसाठी 91 35 दलघफु पाणीदेखील सोडण्यात येणार आहे. या पहिल्या आवर्तनामुळे धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील 34 गावे तर साक्री तालुक्यातील 35 गावे अशा धुळे जिल्ह्यातील एकूण 69 गावांना फायदा होणार असून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील प्रत्येकी 16 गावे अशा 32 गावांमधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

हा पाणीसाठा सोडत असताना या संदर्भात काळजी घेण्याचे आदेश धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. हे पाणी पांझरा नदी मधुन तसेच अनेर प्रकल्पातून सोडण्यात येणार असल्याने या पाण्याच्या मार्गातील केटीवेअर मधील फळ्या तातडीने काढण्यात याव्यात, यासाठी पाटबंधारे विभागाने सनियंत्रण करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीने प्रवाहीत होणारे पाणी विहिरीमध्ये वळवले जाऊ नये, यासाठी नदीकाठच्या विहिरीतील वीजपुरवठा काही काळ खंडित करावा असे देखील नमूद करण्यात आले आहे. संबंधित गावाच्या यंत्रणेने पाणीपट्टी त्वरित अदा करण्याचे देखील सुचवण्यात आले आहे. अक्कलपाडा ते तापी संगमापर्यंत पाणी प्रवाहित राहील याची काळजी यंत्रणेने घ्यावी, तसेच या यंत्रणेला धुळ्याचे पोलीस अधीक्षक यांनी आवश्यक तो बंदोबस्त पुरवावा असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहे. पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी पहिले आवर्तन तातडीने सोडले जाणार असल्याने नदीकाठच्या या गावांना गावांमधील पाणीटंचाई दूर होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button