नाशिक : खरीप हंगामासाठी 98,818 क्विंटल बियाण्यांची मागणी | पुढारी

नाशिक : खरीप हंगामासाठी 98,818 क्विंटल बियाण्यांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी बियाण्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार खरीप हंगामासाठी 98,818 क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या बियाण्याची पुरेशी उपलब्धता राहील, त्या द़ृष्टीने नियोजन केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत सुरुवातीला जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सोनवणे यांनी खरिपाच्या नियोजनाचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी खरीप हंगामातील बियाणे, खते यांचे नियोजन, खतांची मागणी, मंजूर आवंटन याबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण, रासायनिक खतांचे नियोजन, ग्रामकृषी विकास आराखडा, रिसोर्स बँक शेतकरी, खरीप हंगामातील बीजप्रक्रिया मोहीम, पट्टा पद्धतीने पेरणी, जमीन आरोग्यपत्रिका, मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण, कपाशीवरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण आदींबाबत सादरीकरण केले. यावेळी विवेक सोनवणे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र 6.66 लाख हेक्टर असून, त्यासाठी बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी बियाणे उत्पादक सरकारी महामंडळ व खासगी कंपन्या यांच्याकडे मागणी नोंदवली आहे. सर्व बियाणे मिळून 98,818 क्विंटलची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

बियाणे मागणी 
पीक           बियाणे (क्विंटल)
मका           46894
सोयाबीन     73352
भात           18853

हेही वाचा :

Back to top button