नाशिक : शाळेच्या पहिल्या दिवशीच गणवेश; 15 कोटींचा निधी वर्ग | पुढारी

नाशिक : शाळेच्या पहिल्या दिवशीच गणवेश; 15 कोटींचा निधी वर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना यंदा शाळा सुरू होण्याच्या आधीच गणवेश मिळणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदेसह अनुदानित इतर शाळांतील जवळपास 35 लाख 92 हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार असून, त्यासाठी शासनाने 221 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

यात नाशिक जिल्ह्यातील 2 लाख 59 हजार विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शिक्षण विभागाकडे 15 कोटी 54 लाखांचा निधी वर्ग केला आहे. त्यानुसार तालुकास्तरावर निधी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शाळा सुरू होण्याच्या आधी गणवेश मिळेल, असे नियोजन केल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी सांगितले. राज्यात समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना हे गणवेश दिले जातील. पहिली ते आठवी वर्गातील मुली, अनुसूचित जाती – जमाती संवर्गातील मुले – मुली तसेच दारिद्य्ररेषेखालील मुलांना गणवेशाचा लाभ दिला जातो. प्रत्येक शाळेतील व्यवस्थापन समितीकडून खरेदीची प्रक्रिया करण्याचे आदेश दिले आहेत. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश वाटप केले जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 600 रुपयांची तरतूद आहे. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणार्‍या मुलाला दोन गणवेश संच देण्यात येतील. या योजनेपासून कोणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. गणवेशासाठी कापड निवड, रंग आणि शिलाई आदींबाबत ठरविण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समिती यांना दिले आहेत. निधी प्राप्त होताच 15 दिवसांत वर्ग केला जाणार आहे.

डीबीटीला रामराम : यापूर्वी शासनाने विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ घेताना, त्यांच्या बँक खात्यावर गणवेशाची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला होता. थेट बँक खात्यावर रक्कम जमा करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे आता डीबीटी पूर्णपणे वगळण्यात आली असून, शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार आहेत.

Back to top button