नाशिक : नांदगाव येथील अंजूम कांदे या मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 पुरस्काराने सन्मानित | पुढारी

नाशिक : नांदगाव येथील अंजूम कांदे या मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 पुरस्काराने सन्मानित

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा:  पॅरिसा कम्युनिकेशन आयोजित दिल्ली येथे झालेल्या ग्रँड फिनालेत देशभरातील विविध स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. यामध्ये शनिवारी दि. 30 एप्रिल 2022 रोजी डिजेल्स इव्हेण्ट मिस व मिसेस सौंदर्यवती स्पर्धेत मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 पुरस्काराने अंजूम सुहास कांदे यांना सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा या राज्यातून प्रत्येकी तीन स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सामाजिक उपक्रम सामान्य ज्ञान, सांस्कृतिक योजना, व्यक्तिमत्त्व विकास या निकषांवरती अंजूम कांदे यांनी उत्तम गुण मिळवत पुरस्कार पटकावला आहे. बौद्धिक क्षमतेसह सामाजिक कार्य आणि  भविष्यातील समाजहिताच्या विविध योजना या अतिशय आशावादी व्यक्तिमत्वाच्या जोरावर कांदे यांनी अंतिम फेरीत यशाचे शिखर गाठले. उच्चशिक्षित अंजुम या समाजसेवेतही कार्यरत असून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील महिलांच्या विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. देवाज हेल्थ अँड फाउंडेशन तसेच समता ब्लड बँकेच्या माध्यमातून आरोग्य सेवेतही त्यांचे मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे उत्तम गृहिणीसह यशस्वी व्यावसायिक तसेच सेवाभावी समाजसेविका या विविध भूमिकेतूनही त्यांची छाप दिसून येते. त्यांनी नव्या युगाची प्रेरणा घेत सौंदर्य स्पर्धेतही सहभाग नोंदवून स्वयंसिध्दा म्हणून त्यांचा उल्लेख करावासा वाटतो.  मराठमोळी नऊवारी साडी परिधान करत स्पर्धेतील त्यांची वेशभूषा उल्लेखनीय ठरली. मतदारसंघातील स्त्रियांनी भारतीय संस्कृती, संस्कार, घर संसार सांभाळत नव्या युगातही कर्तृत्व सिद्ध करावे, क्षेत्र कोणतेही असो, स्त्रियांनी हे आवाहन स्विकारण्याची क्षमता ठेवावर अशी प्रेरणा त्यांनी यावेळी दिली. या विजयश्रीनंतर जुलै महिन्यात होणा-या साऊथ कोरिया येथील मिसेस वर्ल्ड 2022 स्पर्धेतही भारताचे नेतृत्व त्या करणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button