नाशिक : भारनियमनाचे व्हायरल वेळापत्रक बनावट असल्याचा महावितरणाचा खुलासा | पुढारी

नाशिक : भारनियमनाचे व्हायरल वेळापत्रक बनावट असल्याचा महावितरणाचा खुलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर भारनियमनाचे वेळापत्रक व्हायरल होेत आहे. त्यामध्ये सोमवारपासून (दि. 18) विविध भागांतील भारनियमनांच्या वेळा दिल्या आहेत. परंतु, हे वेळापत्रक बनावट असून, ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या नाशिक शहर विभाग-1 अंतर्गत भागांत होणार्‍या भारनियमनाचे बनावट वेळापत्रक सोशल मीडियावर फिरत आहेत. या वेळापत्रकामुळे ग्राहकांमध्ये गैरसमज व संभ्रम निर्माण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महावितरणने खुलासा करत वेळापत्रक हे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच रहिवासी भागातील भारनियमनाचे कुठलेही वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले नसल्याचे सांगितले. दरम्यान, विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. विजेची वाढती मागणी व कोळशाअभावी अपुर्‍या वीजनिर्मितीमुळे विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार वीजवाहिन्यांवर विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

नाशिक शहर विभाग-1 अंतर्गत असलेल्या विविध भागांत दिवसभरात विविध वेळेमध्ये तीन ते साडेतीन तास भारनियमन होणार आहे. शहरातील विविध भागांतील दिवसनिहाय वेळापत्रकसुद्धा या बनावट जाहीर सूचनेमध्ये देण्यात आले आहे. मात्र, महावितरणने आजमितीस भारनियमनाचे वेळापत्रक तयार केलेले नाही. ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवू नये. तसेच समाजमाध्यमांवर माहितीची खात्री करूनच पुढे पाठवावी, जेणेकरून गैरसमज व संभ्रम निर्माण होणार नाही, असे आवाहन महावितरणने केले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button