लोडशेडिंगच्या प्रश्नाला जातीय, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न : एसपी डॉ. प्रवीण मुंडे | पुढारी

लोडशेडिंगच्या प्रश्नाला जातीय, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न : एसपी डॉ. प्रवीण मुंडे

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीकडून वस्तू खरेदी करू नये, असे मेसेज व्हायरल करण्यात येत आहेत. तसेच लोडशेडिंगच्या प्रश्नाला जातीय आणि धार्मिक रंग लागेल असा प्रयत्न केला जात आहे. याला जनतेने बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी केले.

एस पी मुंडे माध्यमांशी बोलताना म्‍हणाले, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यात 663 मिरवणुका व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यामध्ये 14 एप्रिल रोजी 401 मिरवणुका जिल्ह्यामध्ये निघणार आहेत. तर 255 मिरवणुका या 15 ते 30 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये निघणार आहेत.

14 एप्रिलसाठी जळगाव जिल्ह्यात आठ एसआरपी प्लाटून, सीआरपीएफ प्लाटून, चौदाशे होमगार्ड, 2500 पोलीस आदींचा बंदोबस्त जिल्ह्यात लावण्यात आलेला आहे. दोन वर्षांच्या काळानंतर पोलीस प्रशासन एवढ्या मोठ्या बंदोबस्ताला सामोरे जात असल्याचे यावेळी एसपी यांनी नमूद केले

पुढे बोलताना ते म्‍हणाले, समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा यासाठी सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात येत आहेत. या सोशल मीडियावर सायबर सेलचे लक्ष आहे. मुख्यतः एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीकडून वस्तू खरेदी करू नका, असे मेसेज करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यामधून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम केले जात आहे. तसेच लोडशेडिंगच्या धर्तीवर काही मेसेज पसरविण्यात येत आहेत.

पोलीस दल व वीज कंपनी एकमेकांशी ताळमेळ ठेवूत नसून महत्त्वाच्या सण उत्सवात लोडशेडिंग होणार नाही याची दक्षता घेत आहेत. विद्युत प्रवाह कायमस्वरूपी अखंडित राहील अशा सूचना वीज कंपन्यांना देण्यात आल्‍या आहेत. मात्र हे सर्व डिमांड व सप्लाय वर अवलंबून आहे.

अशा भूल-थापांना कोणीही बळी पडू नये. ज्यांना शंका असेल त्यांनी जिल्हा प्रशासन पोलिसांना प्रत्यक्ष येऊन चौकशी कराव्यात. अतिरिक्त विजेची मागणी करून महत्त्वाच्या सण-उत्सव लोडशेडिंग होऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. लोकांमध्ये गैरसमज पसरविले जात असले तरी गैरसमज पसरवणा-यांना बळी पडू नये. जनतेने अशा लोकांची माहिती पोलिसांना दिली तर त्‍यांची नावे गुप्त ठेवून समजकंठकावर कारवाई केली जाईल, असे एसपी मुंडे म्‍हणाले.

Back to top button