

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : प्रलंबित मागण्यांबाबत शासन दरबारी कोणताच ठोस निर्णय न झाल्याने मंगळवारी (दि.12) नवव्या दिवशीही महसूल कर्मचार्यांचा संप कायम आहे. लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही, अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. संघटनांच्या ताठर भूमिकेपुढे महसूलचे कामकाज ठप्प पडले आहे. तर संपामुळे कामे रखडल्याने सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत.
पदोन्नती, सरळसेवा भरती, नायब तहसीलदारांची ग्रेड-पे, रिक्तपदांची भरती अशा विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचार्यांनी 4 एप्रिलपासून संप पुकारला आहे. शिपायांपासून ते नायब तहसीलदारांपर्यंतचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे महसूलचे कामकाज बंद पडले आहे. संपामुळे कर्मचारी गैरहजर असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात नीरव शांतता आहे. बहुतांश विभागांना टाळे लागले आहे.
ग्रामीण भागातून जिल्हा मुख्यालयी कामे घेऊन येणार्या नागरिकांना संप सुरू असल्याचे उत्तर कर्मचार्यांकडून मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जाण्यासह आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. संपामुळे दाखले, सातबारा, जमीन महसूल, गौण खनिज कारवाया, वसुली आणि विविध परवानग्यांची कामे खोळंबली आहेत. त्याचा सर्वस्वी फटका प्रशासनाच्या तिजोरीला बसत आहे. मागील नऊ दिवसांमध्ये लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती अधिकार्यांकडून मिळते आहे.
संप एसटीच्या मार्गावर
महसूल कर्मचार्यांनी पुकारलेला संपाचा आज (दि.12) नववा दिवस आहे. शासनाकडून संपाबाबत कोणत्याच हालचाली होताना दिसून येत नाही. तर मागील आंदोलनांचा अनुभव बघता शासन केवळ तोंडी आश्वासनांवर बोळवण करत असल्याची भावना कर्मचार्यांमध्ये आहे. परिणामी यंदा कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, असा निर्धार कर्मचार्यांनी केला आहे. त्यामुळे एकूणच चित्र बघता महसूल कर्मचार्यांचा संप आता एसटी कर्मचारी संपाच्या मार्गावर जाताना दिसत आहे.