नाशिक : दोन वर्षांनंतर यंदा चमचमणार काजवा महोत्सव ; वन्यजीव विभागाच्या तयारीला वेग | पुढारी

नाशिक : दोन वर्षांनंतर यंदा चमचमणार काजवा महोत्सव ; वन्यजीव विभागाच्या तयारीला वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने तब्बल दोन वर्षांनी पर्यटकांना भंडारदार्‍यासह कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात चमचमणार्‍या काजव्यांचा निसर्गाविष्कार पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांसोबत बैठका घेत वन्यजीव विभागाने काजवा महोत्सवाचे नियोजन सुरू केले आहे. महोत्सवाच्या तयारीने वेग घेतल्याने निसर्गप्रेमी, पर्यटक आणि स्थानिक आदिवासी कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आणि जूनच्या पहिल्या, दुसर्‍या आठवड्यात भंडारदरा, कळसुबाई अभयारण्याच्या परिसरात काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. पावसाळ्याची चाहूल लागताच अंधारातील काजव्यांची लखलखती दुनिया अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील भंडारदरा वनपरिक्षेत्रात येणार्‍या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या दिशेने वळतात. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे रात्रीच्या अंधारात चमचमणार्‍या काजव्यांना पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना प्रवेश बंदी होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, राज्यातील निर्बंध हटविण्यात आल्याने वन्यजीव विभागाने काजवा महोत्सवाच्या नियोजनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. भंडारदरा धरण क्षेत्रातील मुरशेत, मुतखेल, पांजरे, घाटघर आणि रतनवाडीच्या जंगलात सादडा, बेहडा वृक्षांवर काजवे चमकतात. त्यामुळे या परिसरात येणार्‍या हुल्लडबाज पर्यटकांवर विशेष वॉच ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच वन्यजीव विभाग व इतर यंत्रणांचा जागता पहारा राहणार आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी तीन रेस्क्यू पथकही तैनात करण्यात येणार आहेत.

पर्यटकांच्या वाहनांसाठी ठरावीक गावांमध्ये वाहनतळाची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणीच वाहने उभे करून महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांना पायी जावे लागणार आहे. विनापरवानगी तसेच नियम मोडणार्‍या पर्यटकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत वन्यजीव विभागाने दिले आहे. दरम्यान, काजवा महोत्सवाला दरवर्षी सुमारे 50 हजार पर्यटक हजेरी लावतात. या महोत्सवात लाखो रुपयांची उलाढाल होते. कोरोनामुळे थांबलेले अर्थचक्र यंदाच्या महोत्सवामुळे फिरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वनव्यवस्थापन समित्यांची बैठक
काजवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यासह परिसरातील 17 संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची बैठक वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत महोत्सवाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. तसेच आगामी काळात महोत्सवातील गैरप्रकार रोखण्यासाठी वन्यजीव, पोलिस, उत्पादन शुल्क आदी विभागाच्या संयुक्त बैठकी होणार आहे.

दरवर्षी हजारो पर्यटक मेअखेरीस काजवा महोत्सवासाठी भंडारदर्‍यात दाखल होतात. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे महोत्सव रद्द करण्यात आले होते. आता निर्बंध शिथिल झाल्याने यंदा काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक वनव्यवस्थापन समित्यांसोबत बैठका पार पडल्या असून, महोत्सवाच्या तयारीने वेग घेतला आहे.
– गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य

हेही वाचा :

Back to top button