नाशिक : गिरणारे येथे बिबट्याचा चिमुकलीवर हल्ला | पुढारी

नाशिक : गिरणारे येथे बिबट्याचा चिमुकलीवर हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; गंगापूर धरण क्षेत्रात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू असून, वनक्षेत्र नाशिक (प्रा.) च्या गंगाम्हाळुंगी वनपरिमंडलामधील मौजे गिरणारे येथे बिबट्याने उघाड्यावर झोपलेल्या चिमुकलीवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि.५) पहाटे घडली. अदिती रमेश पागी (वय ८ वर्षे) असे ज‌खमीचे नाव आहे. कुटूंबियांनी प्रसंगवधान राखत हल्लेखोर बिबट्याला पिटाळून लावल्याने पुढील अनर्थ टळला.

गिरणारे येथील येथील मरी आई मंदिर, साडगाव रोड परिसरात मोलमजुरी करणारे रमेश शंकर पागी (रा.शिरसगाव, ता. त्र्यंबकेश्वर) हे कुटुंबियांसमवेत मोकळ्या जागेत झोपले होते. मध्यरात्री दबा धरून बसलेल्या बिबट्याने पागी कुटूंबातील अदितीवर जोरदार हल्ला केला. हल्ल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ कुटूंबियांसह इतर लोकांनी आरडाओरडा करत बिबट्याला पिटाळून लावले. त्यामुळे अदितीचा जीव वाचला.

बिबट्याच्या हल्ल्यात अदितीच्या मानेवर आणि पोटावर जखमा झालेल्या असून, तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अदितीची प्रकृती स्थिर असून, तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात वनविभागाने पिंजरा तैनात केला. तसेच वनकर्मचाऱ्यांच्या पथकाची गस्त वाढविण्यात आल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले.

हेही वाचा :

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली आदिती.

फोटो : ६ मार्च सीटीवनला बिबट हल्ला नावाने.

Back to top button