जळगाव : ‘मराठीच्या मुद्द्यावरून यश येत नसल्‍याने राज ठाकरेंनी हिंदुत्‍वाचा मुद्दा पकडला’ | पुढारी

जळगाव : 'मराठीच्या मुद्द्यावरून यश येत नसल्‍याने राज ठाकरेंनी हिंदुत्‍वाचा मुद्दा पकडला'

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा : मनसेचे विचार भरकटत आहेत, कारण त्यांचे विचारच मनसे आहेत. राज ठाकरे यांची जडण-घडण हिंदुत्वा पासून होती. पक्ष स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी वेगळा विचार मांडला, मात्र राज ठाकरे हे विचारांवर ठाम न राहता दरवेळी ॠतु प्रमाणे बदलत राहिले. दरवेळी बदलणार्‍या भूमिका राज ठाकरे यांच्या सारख्या नेत्यांना शोभत नाहीत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्‍त केली. पोलीस दलाच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी हे वक्‍तव्य केले.

सी टीम डी टीम यांच्याशी देणंघेणं न ठेवता राज ठाकरे यांनी कुणाच्या नादी लागू नये. शिवसेनेवर टीका केल्याशिवाय इतर पक्षांचे पोट भरत नाही. शिवसेनेच्या स्थापनेपासून स्वर्गीय बाळासाहेबांना अनेकजण बोलत राहिले. 50-60 वर्षापासून शिवसेना जिवंत आहे व जिवंतच राहणार. शिवसेनेवर अनेकांनी टीका केल्या. अनेकजण शिवसेना सोडून गेले. पण त्यांची आज अवस्था काय आहे हे आपण पाहतोय.

दिशाहीन माणसांना यश मिळत नाही. त्‍यामुळेच ते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. त्‍यामुळेच राज ठाकरे यांनी शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा पकडला आहे. मराठी मुद्द्यावरून यश येत नसल्याने राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पकडला आहे. राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे ऋतूप्रमाणे बदलनारे वक्तव्य.

Back to top button