नाशिक : लहवितजवळ पवन एक्स्प्रेसचे ११ डबे घसरले; एकाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : लहवितजवळ पवन एक्स्प्रेसचे ११ डबे घसरले; एकाचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरीहून निघालेल्या पवन एक्स्प्रेसचे ११ डबे नाशिकच्या लहवितजवळ रुळावरून आज घसरली.  या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

नाशिक रोड रेल्वे स्टेशन असणाऱ्या लहवित जवळ रेल्वेचे डबे रुळावरून घसरले. ही घटना मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या डाऊन मार्गावर घडली. पवन एक्स्प्रेस नाशिकच्या १२ किमी अगोदर रुळावरून घसरली. रेल्वे पोलिस आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले असून, तहसीलदार आणि नाशिक प्रांत घटनास्थळावर दाखल झाले आहेत. रेल्वेचे व शासनाचे वैद्यकीय पथक देखील घटनास्थळी रवाना झाले आहे. अपघातानंतर अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्‍या आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या विनंतीनुसार एसटी महामंडळ आणि सिटी लिंकच्या बसेस घटनास्थळी हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या घटनास्थळावर सध्या मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, २४ तासांपूर्वीच ओढा येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने, तब्बल पाच तास रेल्वेसेवा खंडीत झाल्याची घटना ताजी आहे.

Back to top button