धुळे : थकबाकीदार मालमत्ता धारकांसाठी महापालिकेची ‘शास्ती’ माफी योजना | पुढारी

धुळे : थकबाकीदार मालमत्ता धारकांसाठी महापालिकेची 'शास्ती' माफी योजना

धुळे पुढारी वृत्तसेवा ; महानगरपालिकेच्या वतीने थकबाकीदार मालमत्ता धारकांसाठी शास्ती माफी योजना लागू करण्यात आली आहे. यात 21 ते 26 मार्च दरम्यान 75 टक्के तर 27 ते 31 मार्च दरम्यान 50 टक्के शास्ती माफी देण्यात येणार आहे. या योजने नंतर थकबाकीदार मालमत्ता धारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

यासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यात झालेल्या चर्चेतून महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त देविदास टेकाळे यांनी ही सवलत योजना जाहीर केली आहे.

सतत दोन वर्षापासून असणारी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता व एकुणच शहराची आर्थिक उलाढाल लक्षात घेता थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिलासा मिळावा, त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडू नये यासाठी हा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेला आहे. यापूर्वीही शास्ती माफीची योजना जाहीर करण्यात आली होती. या निर्णयानुसार घरपट्टी वरील शास्ती मध्ये दि. 21 मार्च ते 26 मार्च या कालावधीत 75 टक्के सूट व 27 मार्च ते 31 मार्च या कालावधीत 50 टक्के सूट देण्यात येणार आहे.

यासंदर्भात भाजपा आझाद नगर मंडळ व अन्य संघटनांनीही शास्ती माफी देण्याबाबत निवेदन सादर केले होते. नागरिकांवर कोणत्याही स्वरूपाचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी शास्ती माफीची मागणी केली होती.

मनपा वरील आर्थिक दायित्व कमी व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांनी या  योजनेचा लाभ घेऊन आपली थकीत रक्कम तातडीने भरणा करावी असे आवाहन महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त देविदास टेकाळे, उपमहापौर अनिल नागमोते, स्थायी समिती सभापती शितल नवले, महिला बालकल्याण सभापती योगिताताई बागुल, उपसभापती आरतीताई पवार, सभागृह नेते राजेश पवार, विरोधी पक्ष नेते, कमलेश देवरे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ही संधी व योजना अंतिम असून यानंतर थकबाकीदार मालमत्ता धारकांवर दंड, जप्ती, सील करणे अशा स्वरूपाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button