नाशिक : गोदाप्रेमींनी स्मार्टसिटी कंपनीला दिला ‘हा’ इशारा, म्हणाले… | पुढारी

नाशिक : गोदाप्रेमींनी स्मार्टसिटी कंपनीला दिला 'हा' इशारा, म्हणाले...

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

स्मार्ट सिटी कंपनीने गोदाघाटाचे सौंदर्य वाढविताना येथील पावित्र्य व पारंपरिक वारशाला धक्का लावता कामा नये, यापुढे असे कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा पुरोहित, सामाजिक कार्यकर्ते व गोदाप्रेमींनी दिला. तसेच, अहिल्याादेवी पूल ते रामसेतूपर्यंत विकासकामे करतांना काँक्रीटीकरण करु नये, अशी मागणीही स्मार्ट सिटीच्या बुधवारी (दि. १६) आयोजित केलेल्या गोदाघाटाच्या पाहणी दौर्‍याप्रसंगी गोदाप्रेमींनी केली.

या दौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्यासह पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, दिलीप शुक्ल, प्रतीक शुक्ल, देवांंग जानी, कल्पना पांंडे, धनंजय पुजारी, चंद्रशेखर पंचाक्षरी आदी उपस्थित होते. तब्बल ६५ कोटींची विकासकामे गोदावरी नदीकाठाच्या लाल व निळ्या रेषेतील पूरप्रभावी क्षेत्रात सुरु आहेत आणि कोटींची कामे झालेली आहेत. आगामी काळात कोट्यवधींची विकासकामे पुरात वाहून जाण्याची शक्यता यावेळी गोदाप्रेमींनी व्यक्त केली. हे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनाही यावेळी सुचविण्यात आल्या. अहिल्यादेवी पुलाजवळ मेकॅनीकल गेट बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पुर नियंत्रणास मदत होईल. तसेच चक्रधरस्वामी मंंदीराजवळील तासकुंडाचाही विस्तार करुन पायऱ्यांची उंंची कमी केली जाईल. तसेच देवी मंदिरामागील तोडलेला सांडवा पुन्हा नव्याने बांधुन देणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

नागरिकांचा पैसा नागरिकांसाठीच गरजेच्या आणि सोयीच्या ठिकाणी खर्च झाला पाहिजे. गोदाघाटावर अनेक विधींसाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र अस्थीविसर्जनसारख्या विधीप्रसंगी भाविकांची संख्या जास्त असते, परंतु, त्यांना निवाऱ्याची सोयच नाही. म्हणून पैठणच्या धर्तीवर नाशिक तिर्थक्षेत्रीही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तशी सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे.

– चंद्रशेखर पंचाक्षरी, कार्याध्यक्ष, पुरोहित संघ

नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत सरदार चौक ते रामकुंड परिसर आणि गोदाघाट परिसरात भुयारी गटार, हायमास्ट, दीपस्तंभ इत्यादी कामांसाठी खोदलेल्या खड्‌ड्यातून मोठ्या प्रमाणात जिवंत जलस्त्रोत आढळून आलेले आहेत. सदर ग्राउंड वॉटर भावी पिढीसाठी जलसंपत्ती असून, त्याचे जतन होण्यासाठी व संरक्षित करण्याकरिता भूजल सर्वेक्षण विभागाला कळवावे.

– देवांग जानी, गोदाप्रेमी

हेही वाचा :

 

Back to top button