

नाशिक (सातपूर) पुढारी वृत्तसेवा : सातपूर परिसरात येथील प्रसिद्ध उद्योजक बाबुराव नागरगोजे यांच्या घरावर मोठा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. घरातील 3 महिला आणि दीड वर्षाच्या मुलाला चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, जाधव संकुल परिसरातील लाव्होटी मळा येथील बाबुराव नागरगोजे हे आपल्या 'भगवान गड' या बंगल्यातून सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घराबाहेर पडल्यानंतर पावणे अकराच्या सुमारास चार ते पाच जणांनी बंगल्यात प्रवेश करत घरातील सासू-सुना आणि दीड वर्षाच्या मुलाला सेलो टेपने बांधून ठेऊन तसेच चाकूचा धाक दाखवून घरातील 40 ते 50 तोळे सोने व 2 लाख रुपये घेऊन गेले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. दरोडेखोरांचा सुगावा लागावा म्हणून श्वान पथक बोलवण्यात आले होते. बाबूशेठ नागरगोजे यांनी याबाबत माहिती दिली असून दुकानावर गेलो असता घरून सुनेने फोन केला व फोनवर घडलेली घटना सांगितल्याचे सांगितले. सासू सून आणि मुलगा यांना सेलो पट्टीने बांधून ठेवले व दीड वर्षाच्या लहान मुलाला चाकू लावल्याने महिला घाबरून गेल्या होत्या. मारू नका तुम्हाला काय न्यायचे ते घेऊन जा असे सांगितल्यावर घरातील सर्व सामान अस्तव्यस्त करत रोख रुपये 2 लाख आणि 40 ते 50 तोळे सोने घेऊन दरोडेखोर पळून गेल्याची माहिती नागरगोजे यांच्या सूनेने दिली.
पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी या घटनेबद्दल माहिती दिली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तपासासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या आरती नागरगोजे यांनी आपबीती कथन केली.
दरोडे खोरांनी केला डान्स
पाचजण सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घरात घुसले. सासूबाई आणि दोघी सुनांना पकडून तोंड दाबून गप्प बसा असे सांगून देवघरात बसवले. पैसे कुठे आहे विचारले, एकाने आम्हाला चाकू लावून ठेवला बाकीच्या चार जणांनी घर अस्तव्यस्त केले. लहान मुलाला देखील चाकू लावला. यावेळी पैसे आणि सोने मिळाल्याने दरोडेखोरांनी घरात डान्स केला. या दरोडेखोरांपैकी 2 जणांनी मास्क घातले होते. तर 1 जणाला 1 दिवस अगोदरच घराबाहेर बघितले होते अशी माहिती आरती नागरगोजे यांनी दिली.
दरम्यान नाशिकला चोरी घरफोडीच्या सातत्याने उघडकीस येत आहेत. आता दिवसाढवळ्या अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.