नाशिक : जिल्हा परिषदेच्या लोगोमधील रंगसंगती बदलून प्रशासनाने ती निश्चित केेली आहे. या नव्या रंगसंगतीच्या लोगोस 28 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाली आहे. यामुळे रंगीत लेटरहेडवर जिल्हा परिषद लोगोची एकच रंगसंगती निश्चित झाली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेची 1962 मध्ये स्थापना झाली. त्यावेळी जिल्हा परिषदेचा लोगो निश्चित करण्यात आला आहे. मात्र, त्यावेळी हा लोगो केवळ काळा व पांढर्या रंगात तयार करण्यात आला होता. यामध्ये मध्यभागी दीपमाळ व त्याभोवती गोलाकार करून त्यावर विकास व प्रेरणा असे शब्द लिहिलेले आहेत. लोगो तयार झाला, त्यावेळी रंगीत छपाईचा विचार केला नाही. मात्र, अलीकडच्या काळात जिल्हा परिषदेचे लेटरपॅड चार रंगांमध्ये छापले जात आहे. यामुळे त्यावरील लोगो रंगीत करताना याला कोणता रंग द्यावा, असा प्रश्न पडल्यानंतर प्रत्येक कार्यालयात व लेटरहेड तयार करणार्या व्यक्तिपरत्वे त्याचा रंग बदलला जाई. यामुळे वेगवेगळ्या लेटरहेडवर वेगवेगळ्या रंगाचा लोगो दिसत असे. ही विसंगती दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने एक समिती नेमून जिल्हा परिषदेचा लोगो निश्चित केला.