भाषा संवर्धनासाठी मराठीचा प्रचार-प्रसार गरजेचा : डॉ. माधुरी कानिटकर | पुढारी

भाषा संवर्धनासाठी मराठीचा प्रचार-प्रसार गरजेचा : डॉ. माधुरी कानिटकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाषा संवर्धनासाठी मराठीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (नि.) यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शुक्रवारी (दि. 25) मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. कानिटकर बोलत होत्या. या वेळी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, डॉ. सुबोध मुळगुंद आदी उपस्थित होते.

डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या की, भाषा हे खरे तर संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम आहे. मराठी भाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. भाषा शिकत असताना मुलांची बौद्धिक, मानसिक, वाचिक क्षमता महत्त्वाची असते. यासाठी भोवतालचे वातावण व संस्कृतीचा भाषेवर प्रभाव असतो. भाषा समृद्ध होण्यासाठी मातृभाषेतील साहित्याचे नियमित वाचन करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. कालिदास चव्हाण यांनी प्रास्ताविकात, आपण मराठी भाषेत नियमित संभाषणासह वाचणे, लिहिणे व ऐकणे या गोष्टींची सवय केली पाहिजे. या गोष्टींमध्ये सातत्य ठेवल्यास मराठी भाषा समृद्ध होईल, असे सांगितले. डॉ. मुळगुंद यांनी मार्गदर्शन करताना, मराठी मातृभाषा ही आपली खरी शक्ती आहे. त्यामुळे मुलांना मराठी भाषेच्या प्रभुत्वाची जाण करुन द्यावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी गायन, नाट्यप्रवेश, कविता वाचन सादर केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला वित्त व लेखाधिकारी नरहरी कळसकर, चेतना पवार, प्रमोद पाटील, प्रतिभा बोडके, डॉ. संतोष कोकाटे, शैलेंद्र जमदाडे, डॉ. संजय नेरकर, अनिल लंकेश्वर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button