कोल्हापूर : पूरग्रस्तांना मोफत धान्य, रॉकेल; भुजबळ यांची घोषणा | पुढारी

कोल्हापूर : पूरग्रस्तांना मोफत धान्य, रॉकेल; भुजबळ यांची घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर पूरग्रस्तांना मोफत धान्य, रॉकेल दिली जाईल अशी घोषणा भुजबळ माहिती अन्‍न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.

महापुराचा फटका बसलेल्या कोल्हापूरसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली या सहा जिल्ह्यांमधील आपत्तीग्रस्तांना मोफत अन्‍नधान्यासह रॉकेलचे वाटप केले जाईल, अशी माहिती अन्‍न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आपत्तीग्रस्त भागात दुप्पट क्षमतेने मोफत शिवभोजन थाळीचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर भुजबळ यांनी शनिवारी भुजबळ फार्म येथील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अतिवृष्टीचा फटका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे.

राज्यातील नैसर्गिक संकटाशी लढताना सरकार खंबीरपणे जनतेच्या पाठीमागे उभे आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांत प्रतिकुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे गहू नको असेल त्यांना गव्हाऐवजीतांदूळ दिले जातील.

प्रत्येक कुटुंबाला 5 किलो डाळ देण्याबाबतसुद्धा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या जिल्ह्यांतील शिवभोजन थाळीचा इष्टांक दुप्पट करण्यात आला आहे. म्हणजेच या आपत्तीग्रस्त भागातील शिवभोजन केंद्रांवर आता दुप्पट क्षमतेने शिवभोजन थाळींचे वितरण केले जाणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.

ना. भुजबळ म्हणाले, पूरस्थितीमुळे ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेले आहे किंवा पाण्यात आहे तेथे इतर ठिकाणावरून शिवभोजनाची पाकिटे वितरणाची परवानगी देण्यात आली आहे. पाकिटांच्या वितरणासाठी त्याचप्रमाणे वीज नसलेल्या ठिकाणी किंवा शिवभोजन अ‍ॅपसाठी कनेक्टिव्हिटी नसलेल्या भागात थाळीच्या नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर तहसीलदारांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर करावा, अशा सूचना दिल्याचे भुजबळ म्हणाले.

आदेशाची वाट बघू नका

महापुराने बाधित जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने मोफत अन्‍नधान्य व केरोसिन वितरणाचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत आदेश काढण्यात येणार आहे. मात्र, आदेशाची वाट न बघता तातडीने मदतकार्य सुरू करावे, असे निर्देश भुजबळ यांनी यंत्रणांना दिले आहेत.

Back to top button