वीर जवान प्रसाद क्षीरसागर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार | पुढारी

वीर जवान प्रसाद क्षीरसागर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

दिंडोरी पुढारी वृत्तसेवा : येथील जवान प्रसाद क्षीरसागर यांना तीन दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्य बजावत असताना अपघाती वीरमरण आले. आज त्यांच्यावर येथील सीड फार्मच्या मैदानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘वीर जवान अमर रहें’, ‘भारत माता की जय’ अशा जयघोषाने वातावरण भावूक झाले होते.

लष्करी जवान प्रसाद क्षिरसागर यांचे पार्थिव सकाळी मुंबई येथून टेलिफोन कॉलनी उमराळे रोड येथील त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर दोन तास दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी टाहो फोडला. त्यानंतर त्यांचे पार्थिव घेऊन फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या गाडीवर बनवण्यात आलेल्या चित्ररथामध्ये नेण्यात येत असताना रस्त्यावर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.

रस्त्यावर रांगोळ्यांनी रॅलीद्वारे घरापासून गावातील मोठा वाडा मार्गे मारुती मंदिर, राजेश्वर गल्ली मार्गे पालखेड रोड, पालखेड चौफुली वरून नाशिक कळवण रस्त्याने दिंडोरी तहसील कार्यालय येथून सीड फार्मच्या मैदानावर अंत्यसंस्कारच्या ठिकाणी आणण्यात आले.

प्रारंभी लष्कर व पोलिस दलाकडून तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारतीताई पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पोलिस उपअधीक्षक अमोल गायकवाड, सैन्य अधिकारी कर्नल एस. के. शर्मा, जिल्हा सैनिक अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले, मेजर राकेश माटा, सुबेदार रमेश पाटील, दिंडोरी माजी सैनिक संघटना अध्यक्ष भरत खांदवे, विभागीय अध्यक्ष सुभेदार मेजर दिनकर पवार, सुबेदार मनोहर भोसले, माजी सैनिक संघटना इगतपुरी कार्याध्यक्ष विजय कातोरे, नगराध्यक्ष मेधा धिंधलें, उपनगराध्यक्ष अविनाश जाधव, नगरसेवक नितीन गांगुर्डे, बाळासाहेब जाधव आदींसह विविध तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांसह दिंडोरी येथील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Back to top button