छगन भुजबळ : 'मी माझा पतंग वाचवता वाचवता थकलो आहे, त्यामुळे पतंग काटायच्या भानगडीत पडत नाही' | पुढारी

छगन भुजबळ : 'मी माझा पतंग वाचवता वाचवता थकलो आहे, त्यामुळे पतंग काटायच्या भानगडीत पडत नाही'

येवला, पुढारी वृत्तसेवा

माझा पतंग कापण्यासाठी सगळे तयार आहेत. पण मी कोणाचा पतंग काटायच्या भानगडीत पडत नाही. मात्र काही जण फक्त माझ्या पतंगाकडे लक्ष देऊन असतात. मी माझा पतंग वाचवता वाचवता थकलो आहे, पण मी थकणार नाही, कोणी कितीही माझ्यावर केसेस करण्यासाठी कोणालाही पुढे केले तरी मी लढत राहणार असे स्पष्ट मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

येवला येथे विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आलेल्या पतंगबाजी वेळी ते बोलत होते. त्यातून केंद्रातील भाजप सरकारला चिमटे काढण्याची एकही संधी सोडली नाही. आपण कर्ज बुडवलं की केंद्र सरकार वीज कंपनी देईल. मग अदानी-अंबानींकडून कोणतीही सबसिडी मिळणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी येवला येथे विविध विकास कामांचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, वीजेसाठी म्हणून नाशिक जिल्ह्याकरिता 35 कोटी रुपये काढून ठेवले आहेत. त्यामुळे येथून पुढे आपल्याला छोट्या-मोठ्या कामासाठी कोणाकडे जाण्याची गरज भासणार नाही. आपले वीजमंत्री केंद्रासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भात प्रश्न मांडणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महावितरणला वाचवा

भुजबळ पुढे म्हणाले की, सध्या महावितरणवर 50 ते 60 हजार कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज बुडाले की, नेहमीप्रमाणे आपले केंद्र सरकार वीज कंपनी देईल. मग त्यावेळी अदानी – अंबानींकडे तुम्हाला कोणतीही सबसिडी मिळणार नाही. त्यामुळे ही वीज कंपनी वाचवणे आपले कर्तव्य आहे. ज्यामुळे कोणत्याही अदानी-अंबानींच्या ताब्यात ही कंपनी जाणार नाही. ती त्यांच्या ताब्यात जाऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा

Back to top button