

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : चेंबूर-वाशीनाका येथे डोंगराळ भागात राहणार्या लोकांच्या घरावर दरड कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाला आणि शहरात डोंगरवस्त्यांवर राहणार्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
मुंबई शहरासह उपनगरातील 24 वॉर्डपैकी 21 वॉर्डमध्ये दरड कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे अख्खे मुंबई शहरच दरडीच्या छायेखाली आहे असे म्हणावे लागेल. यात प्रत्यक्षात डोंगर उतारावर राहणार्या सुमारे चार लाख मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे.
या लोकांना पावसाळ्याच्या तोंडावर स्थलांतराचा इशारा नोटिसांमधून मिळतोच मिळतो. या नोटिसा बजावून पालिका मोकळी होते. एरव्ही वर्षभर त्यांची आठवणही यंत्रणेला नसते.
शहरासह पश्चिम व पूर्व उपनगरात सुमारे 263 ठिकाणी असे डोंगर उतार असून, या डोंगरांच्या कुशीत तब्बल 263 वस्त्या आहेत. सर्वाधिक 145 वस्त्या भांडूप भागात आहेत. त्याखालोखाल घाटकोपर भागात 30 वस्त्या डोंगर उतारावर वसल्या आहेत.
या वस्त्यांना सालाबादाप्रमाणे यंदाही स्थलांतराचा आणि सतर्कतेचा इशारा मिळाला; परंतु त्यांच्या सुरक्षित पुनर्वसनाकडे ना पालिकेने लक्ष दिले ना राज्य सरकारने. परिणामी, दरवर्षीच पावसाळ्यात या वस्त्यांमधील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे.
मृत्यूच्या छायेखाली पावसाळ्याचे चार महिने काढणार्या या डोंगरवस्त्यांचे जिणे कधीतरी पालिका आणि राज्य सरकारची यंत्रणा मनावर घेणार आहे का ?
मुंबईतील भांडुप, विक्रोळी, साकीनाका, कुर्ला, मलबार हिल या ठिकाणी नेहमीच दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर या ठिकाणी सर्वाधिक दरडी कोसळल्या आहेत.
मुंबईतील जवळपास चार लाख नागरिक हे दरडीच्या छायेत वास्तव्य करत आहेत. अर्थात डोक्यावर दरड घेऊन जगत आहेत. पर्यायच नसल्याने शहरातील अनेक कुटुंबांना जीवमुठीत घेऊन डोंगराळ भागात राहावे लागत आहे.
मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये धोकादायक ठरू शकतील अशा जागी जर वस्ती असेल तर त्यांना तोंडी आणि लेखी नोटीसा देण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लवकरात लवकर अशा वस्त्यांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत.
तसेच गरजेनुसार तात्पुरत्या स्वरुपात किंवा कायमस्वरुपी धोकादायक जागांवरुन वस्ती स्थलांतरित करण्याबाबत पालिकेकडून लवकरच कार्यवाही केली जाणार आहे.
अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईतील धोकादायक ठिकाणी असलेल्या वस्त्यांचा आढावा घ्या, असे निर्देश महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनाही दिले आहेत.
आता हा आढाव कधी पूर्ण होईल आणि दरडीच्या छायेखालील मुंबईकरांना कधी सुरक्षित ठिकाणी हलवले जाईल, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.