मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिमगा आणि धुळवडीच्या सुट्टीनंतर बुधवारपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. पहिल्या आठवड्यात विरोधकांनी कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले होते. आता कांद्याच्या जोडीला राज्यातील अवकाळी पावसाच्या मुद्द्यावरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.
कांद्याचे दर घसरल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने हस्तक्षेप योजनेसह नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीची घोषणा केली होती. मात्र, अनेक ठिकाणी नाफेडची खरेदी केंद्रे सुरू झाली नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. शिवाय, 2017-18 च्या धर्तीवर अनुदानाची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, गेल्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांकडून रेटला जाण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांनी राऊतांना 48 तासांत लेखी खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. तर विधान परिषदेने आठ दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. स्वतः राऊत यांनी उत्तर देणार असल्याची भूमिला घेतली आहे.