

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयाने १२ एप्रिलला सुनावणी निश्चित केली.
न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी सोमवारी उभय पक्षकारांची संमती घेत युक्तिवादासाठी सुनावणीची तारीख पक्की केली. सुनावणी पूर्ण होईपर्यंत मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांना ईडीच्या कारवाईपासून देण्यात आलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले. ईडीने हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली. या अनुषंगाने ईडीकडून निष्कारण अटक केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करीत हसन मुश्रीफ यांचे मुलगे नाविद, आबिद आणि साजिद यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाद मागितली. अँड. प्रशांत पाटील यांच्यामार्फत दाखल केलेल्या या अर्जांवर गुरूवारी न्यायालयाने उभय पक्षकारांची संमती घेतली.