मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सुमारे 39 हजार 53 शेतकर्यांच्या दहा हजार रुपये मुदत ठेवीच्या तारणावर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला 40 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. शेतकर्यांना फसवून आणि जबरदस्तीने प्रत्येकी दहा हजार रुपये मुदत ठेवीत ठेवण्यात आले. याप्रकरणी सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा आणि बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे.
पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले की, 'ईडी'ने कोल्हापूर जिल्हा बँकेत सर्च ऑपरेशन केले असता त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेत सुमारे 39 हजार शेतकर्यांना सरकारने मदत म्हणून दिलेले पैसे मुदत ठेव योजनेत ठेवून त्या मुदत ठेवीच्या तारणावर माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला 40 कोटींचे कर्ज दिल्याचे समोर आले. 25 शेतकर्यांनी प्रत्येकी 2 ते 50 हजारांपर्यंत रक्कम मुदत ठेव म्हणून दिली. उर्वरित शेतकर्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये मुदत ठेवीत ठेवले. एकूण 39 कोटी 91 लाख 41 हजार रुपये जबरदस्तीने शेतकर्यांची लूट करून हे पैसे बँकेत ठेवण्यात आले. त्यावर कारखान्याला कर्ज दिले गेले. याप्रकरणी आपण कारवाईची मागणी केल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा बँक आणि हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी शेतकर्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. बँकेच्या संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई करावी, असेही सोमय्या म्हणाले.